आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात जानेवारीपासून काँग्रेसचे नोटाबंदीविरोधात आंदोलन, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदी तसेच जनहिताच्या विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस येत्या जानेवारीपासून रस्त्यावर उतरेल, अशी घोषणा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली. परंतु आंदोलन नेमके कसे असेल, कोठे असेल, याची माहिती त्यांनी दिली नाही. हे सर्व प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार ठरवतील, असे त्यांनी सांगितले.
 
काँग्रेसकडून देशभर आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील आंदोलनाची घोषणा करण्याची जबाबदारी पक्षाने थोरात यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार थोरात दुपारी शहरात आले आणि एका तारांकित हॉटेलात त्यांनी या आंदोलनाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेस जिल्हा तथा शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, महिला शहराध्यक्षा सरोज मसलगे, माजी शहराध्यक्षा रेखा जैस्वाल, चंद्रभान पारखे, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आलेले पक्ष निरीक्षक बी. आर. कदम, जगन्नाथ काळे आदी उपस्थित होते.
 
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा दावा मोदींनी केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. काळा पैसा कोठे आहे, याचे उत्तर मोदींकडे नाही. त्यामुळे त्यांनी आता ‘कॅशलेस’चे थोतांड बाहेर काढले. सामान्यांना मुबलक चलन केव्हा मिळणार याचेही उत्तर मोदी यांनी दिले नाही. त्यामुळे सरकारविरोधात आंदोलन करण्याचे काँग्रेसने ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
जबाबदारी नको म्हणून 
आंदोलनामागीलत्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केली असता थोरात यांनी आंदोलनाच्या नियोजनाची घोषणा केली असती तर त्याच्या यशस्वितेचे किंवा फसल्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती. यापूर्वीचे काँग्रेसचे आंदोलन फसले होते. त्यामुळे चांगले झाले तरी आणि फसले तरी सर्व जबाबदारी पवारांवर असेल, त्यामुळेच त्यांनी आंदोलनाच्या सर्व नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याचे कळते. जानेवारीला शहरात मुस्लिम बांधवांचा मूकमोर्चा आहे. त्यामुळे जानेवारीनंतर काँग्रेसकडून आंदोलन केले जाईल. 
 
 
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे बोट 
आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला, असा प्रश्न विचारताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या आंदोलनाशिवाय मी अन्य कोणत्याही विषयावर बोलणार नाही. जे काही विचारायचे ते प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना विचारा, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तार यांनी नेते प्रचाराला आले नाहीत, अशी तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्याच विरोधात तक्रारी केल्या. त्यामुळे तूर्तास सत्तार यांना या पदापासून दूर ठेवत नामदेव पवार यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यामागे थोरात यांनीच हालचाली केल्याची चर्चा आहे.
 
थेट सोनिया किंवा राहुल गांधी यांच्याशीच चर्चा होईल, अन्य कोणत्याही राज्यातील नेत्यांशी चर्चा होणार नाही, असेही सत्तारांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यांचे मन वळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कोणतेही प्रयत्न झाले नाही. यासंदर्भात सत्तार यांच्याशी चर्चा का केली नाही, त्यांनी राजीनामा मागे घेतला असता, असा पत्रकारांच्या प्रश्नाचा सूर होता. परंतु थोरात यांनी त्याला बगल दिली. आज मी फक्त काँग्रेस आंदोलनाच्याच विषयावर बोलणार, असा सूर लावून धरला ते इतर कोणत्याही विषयावर बोलले नाहीत.
 
बातम्या आणखी आहेत...