आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील डॉक्टरच्या ‘डेन्टाइम्स’ अॅपचा गौरव, "अॅपब्रेन' या जागतिक संस्थेकडूनही दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता त्याचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा म्हणून शहरातील डॉ. गौरव बोर्डे यांनी ‘डेन्टाइम्स’ या मोफत अँड्रॉइड अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे घरबसल्या लोकांना दंतोपचाराबद्दल माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे डॉ. गाैरव यांच्या या प्रयत्नांची ‘अॅप’ला रँकिंग देणाऱ्या ‘अॅपब्रेन’च्या टीमनेही दखल घेतली आहे. दंत आरोग्यावरील या अॅपला नेटिझन्सची चांगली पसंती मिळत अाहे. देश-विदेशातील १६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. या अॅपच्या माध्यमातून पाच हजार जणांना रोजगार मिळाल्याचा दावा डॉ. गौरव यांनी केला. गौरव हे सिडको एन-५ येथील रहिवासी रामदास बोर्डे यांचे पुत्र आहेत. त्यांनी २००७ मध्ये कर्नाटकमधील चित्रदुर्गच्या एसजेएम डेंटल महाविद्यालयातून बीडीएसची पदवी घेतली. त्यानंतर २०१० मध्ये एचडीएम कॉलेज, मुंबई येथून एमडीएस पूर्ण केले.

मासिकामुळे संकल्पना सुचली : बंगळुरू येथे गौरव यांनी कॅम्पसमधील वार्तांकनासाठी डेंटटाइम्स हे मासिक २००७ मध्ये सुरू केले होते. छपाईचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना अॅपची कल्पना सुचली. अॅपनिर्मितीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने त्यांनी गुगलवरील अॅप निर्मितीची माहिती घेऊन २०११ मध्ये ‘डेन्टाइम्स’ हे अॅप तयार केले. ‘डेन्टाइम्स’ नावाने नोंदणी करून हे अॅप सर्व युजर्ससाठी गुगल प्ले स्टोअरहून मोफत डाऊनलोड करता येते. अॅपच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर, नवीन औषधींबाबतची माहिती घेता येते. २०१४ मध्ये १३ हजार जणांनी हे अॅप डाऊनलोड केले होते. अॅपचा प्रतिसाद पाहता जुलै २०१५ मध्ये या अॅपचे रिलाॅचिंग करण्यात आले असल्याचे डॉ. गौरव यांनी सांगितले. या अॅपवरील जॉबसर्च लिंकच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक जणांना नोकरी मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला. डेन्टल सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेशी मे २०१५ मध्ये ‘टायअप’ केले आहे. ‘डेन्टाइम्स’चे काम पाच जणांची टीम पाहते. डॉ. सुमन गोयल मुख्य संपादक आहेत, तर रोजगारविषयक माहिती डॉ. कनिस अग्रवाल अपडेट करतात. डेंटल ह्युमर सेक्शन डॉ. सुधांशू यादव यांच्याकडे आहे व दंत आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. संतोक सिंग प्रश्नपत्रिका अॅपवर टाकतात.
अॅपच्या माध्यमातून उपचार
या अॅपमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधून रात्री-अपरात्री तत्काळ मदत मिळवण्याची सुविधाही आहे. आयुर्वेदाबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील माहितीही लोकापर्यंत पोहोचवण्याचा डॉ. गौरव यांचा मानस आहे. देशभरातील १६ हजारांवर युजर्सनी तसेच जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, रशियातील अँड्राइड युजर्सनीही हे अॅप डाऊनलोड केले आहे. अॅप दुसऱ्या रँकिंगमध्ये आल्याबद्दल १८ लाखांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र मिळाले असल्याचे डॉ. गौरव यांनी सांगितले.