आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खातेवाटपाचा तिढा: शिक्षण, आरोग्यामध्ये ‘देशमुखी’, शिवसंग्रामचे ‘खाईन तर तुपाशी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शिक्षण आणि आरोग्य खात्यावरून रखडलेला खातेवाटपाचा तिढा बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सुटून शिक्षण आरोग्य खात्यामध्ये ‘देशमुखां’ची ‘राजे’शाही आली खरी, परंतु शिवसंग्रामने मात्र ‘खाईन तर तुपाशी’ अशी भूमिका घेत कृषी आणि पशुसंवर्धन खाते घेण्यास नकार दिला. त्यामुळे अध्यक्षा सविता गोल्हार यांच्याकडे तूर्तास या खात्याचा पदभार गेला. उपाध्यक्षा जयश्री मस्के या तूर्तास बिनखात्याच्या सभापती आहेत. 
 
जिल्हा परिषदेची खातेवाटपासाठी १७ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षा जयश्री मस्के काँग्रेस सदस्य राजेसाहेब देशमुख या दोघांनीही शिक्षण आरोग्य खात्यावर दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. अध्यक्ष सविता गोल्हार यांनी सभा तहकूब केली होती. बुधवारी पुन्हा ही सभा घेण्यात आली. दुपारी एक वाजता स्काऊट भवनमध्ये बैठकीला सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला बालकल्याण सभापती शोभा दरेकर यांची उपस्थिती होती. सुरुवातीलाच उपाध्यक्षा जयश्री मस्के यांना शिक्षण आरोग्य खाते देण्याबाबत अशोक लोढा यांनी मांडलेला ठराव मागे घेत हे खाते राजेसाहेब देशमुखांना देण्याचा ठराव मांडला. बहुमताने राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण, आरोग्य खाते देण्यात आले. दुसरीकडे कृषी पशुसंवर्धन खाते उपाध्यक्षा जयश्री मस्केंनी घेण्याबाबत अध्यक्षा गाेल्हार यांनी त्यांना विनंती केली, परंतु मस्के यांनी खाते घेण्यास नकार दिला. यावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. अखेर कृषी पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त पदभार गोल्हार यांच्याकडे तर बांधकाम अर्थ खाते सभापती युधाजित पंडित यांना देण्यात आले. 
 
दर्जा उंचावेल असे काम करू 
- शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ही प्रयत्न असतील. त्यामुळे खात्याचा दर्जा उंचावेल, असे काम करू.
-राजेसाहेब देशमुख, शिक्षण आरोग्य सभापती 
 
शेतकऱ्यांचा बेगडी पुळका 
- सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचा बेगडी पुळका असून ते नौटंकी करत आहेत. हे खाते घेण्यास कुणीच तयार नसल्याने अध्यक्षांकडे अतिरिक्त पदभार देण्याची नामुष्की आली आहे.
-बजरंग सोनवणे, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस 
 
मतदानाची तयारी होती 
खाते वाटपाचा तिढा सरळ सुटला नाही आणि थेट मतदारापर्यंत वेळ आल्यास भाजपने सकाळपासूनच मतदानाची तयारी केली होती. यासाठी विरोधकांनाही हाताशी धरून संख्याबळ वाढवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार मतदान झाले असते तर ४० पेक्षा अधिक मते देशमुख यांना मिळाली असती. 
 
‘...तर कृषी खाते घेऊ’ 
खातेवाटपाच्या तिढ्यानंतर शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के यांनी पत्रकारांना सांगितले की, पालकमंत्री यांनी देशमुख यांना आपण शिक्षण आरोग्य खात्याचा शब्द दिल्याचे सांगितल्याने ठराव मागे घेऊन देशमुखांचे नाव सुचवले. परंतु कृषी पशुसंवर्धन खाते घ्यावे हे पालकमंत्र्यांनी सांगितलेच नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...