आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३ नदीपात्रांचा विकास व्हावा : डॉ. कांगो, डाॅ. दिवाण, जलतज्ज्ञ पुरंदरे यांनी केली पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - औरंगाबाद जिल्ह्यात लहान-मोठ्या ४० नद्या असून त्यापैकी २३ लुप्त झाल्या आहेत. येळगंगा नदीप्रमाणेच या नद्यांचाही विकास झाला तर जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटेल, असा आशावाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केला. लोकसहभागातून सुरू झालेल्या येळगंगा नदीच्या विकासकामांची पाहणी करताना ते बोलत होते.

एेतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या येळगंगा नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी नागरिकांनीच पुढाकार घेतला असून लोकसहभागातून हे काम सुरू आहे. शुक्रवारी डॉ. कांगोंसह औरंगाबाद सामाजिक मंचाचे निमंत्रक डॉ. विजय दिवाण, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, शांतीगिरी महाराज, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शाखा सचिव प्रकाश बनसोडे आदींनी येळगंगा नदीच्या कामाची पाहणी करत माहिती घेतली. डॉ. कांगो म्हणाले, गावविकासासाठी आपणही योगदान द्यावे या भावनेतून सुरू झालेले हे अभियान कौतुकास्पद आहे. असे अभियान जिल्हाभरात राबवले तर जलसंकट दूर होईल. सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यामुळे २३ नद्या लुप्त झाल्या आहेत. औरंगाबादसह पूर्ण जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण बनली आहे. हे जलसंकट परतावून लावण्यासाठी येळगंगा नदीच्या अभियानाप्रमाणेच या नद्यांचाही विकास करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

प्रशासनाचा कस लागणार
या अभियानांतर्गत नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यासह डोह बनवण्यात येणार आहेत. यामुळे जलसाठ्यात वाढ होणार असून प्रशासनाला महिनाभरात बंधारे उभारावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचा कस लागणार आहे. खोलीकरणाचे काम वेरूळ गावापासून पुढे सुरू असून या कामात शेतकऱ्यांनी अडचणी आणू नयेत यासाठी प्रशासनाला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

बंधारे प्रशासनाने उभारावेत
‘दिव्य मराठी’ने अभियान सुरू केल्यानंतर अनेकांनी या कामासाठी मदत केली. त्यातून स्वयंसेवकांना अभूतपूर्व यश मिळत आहे. या कामासाठी आश्रमानेही पुढाकार घेतला असून आतापर्यंत ४०० ट्रॅक्टर गाळ काढण्यासह अर्ध्या किलोमीटरच्या विकासाची जबाबदारीही स्वीकारली आहे. प्रशासनाने वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंत घाटाची उभारणी करावी.
शांतीगिरी महाराज