आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयाराच्या तोंडावर प्रचंड गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरीचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दौलताबाद येथील जगप्रसिद्ध देवगिरी किल्ल्याची मोठी पडझड होत आहे. अकराशे पायऱ्या असलेल्या किल्ल्यावर अनेक धोकादायक स्थळे तयार झाली आहेत. राज्यभरातील शाळांच्या सहली सध्या किल्ल्यावर येत आहेत. मुले शिस्त मोडून भुयारी मार्गात जात आहेत. तेथील काही कठडेही तुटले आहेत. वरून खाली येणारे आणि खालून वर जाणाऱ्या पर्यटकांची भुयारात कोंडी होत आहे. तेथे कोणी सुरक्षा रक्षकही नसल्याने धोक्याची शक्यता आहे. दिल्लीतील कुतुबमिनारमध्ये १९८१ मध्ये चेंगराचेंगरी झाली होती. तशीच घटना या भुयारी मार्गातही होण्याची भीती काही पर्यटकांनी व्यक्त केली.
दिवाळी संपताच शाळांच्या सहली निघतात. दौलताबाद येथील किल्ला पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातून सहली येत आहेत. सध्या दिवसाला दहा ते पंधरा हजार पर्यटक भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर किल्ल्यात जागोजागी कर्मचारी तैनात हवेत. मात्र अपुरी कर्मचारी संख्या असल्याने मोजक्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. पाहिजे त्या ठिकाणी ते थांबत नाहीत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर चांदमिनारपर्यंत दगडधोंड्यांतून वाट काढत पुढे जावे लागते. त्यापुढचा रस्ता चांगला आहे. पुढचा दगडी कोट ओलांडल्यावर ठिकठिकाणी धोकादायक स्पॉट आहेत. मेंढा तोफेसमोर खंदक असून तेथील पुलावर तरुण नाचतात. दोन्ही बाजूच्या खंदकात भरपूर पाणी साचले आहे. घनदाट झाडीही आहे. या खंदकात पर्यटक पाण्याच्या बाटल्या कचरा फेकतात.

भुयारी मार्गावर गोंधळ : खंदकओलांडून पुढे गेल्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग भुयारी, तर दुसरा भुलभुलैय्याचा मार्ग आहे. भुयारातून पायऱ्या चढून जावे लागते. थोडे पुढे गेल्यावर किट्ट अंधार लागतो. भुयारात तरुण मुले-मुली प्रचंड आरडाओरड करतात. तेथे खालून कोसळण्याच्या मार्गावर आहे.

जीवधोक्यात घालून सेल्फी : अकराशे पायऱ्या चढून जाण्यात तरुणाई पुढे असते. किल्ल्याच्या सर्वात वर बारादारीच्या कॅनॉपीवर चढून सेल्फी काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तेथे एकही सुरक्षा रक्षक नाही. ही बारादारीची कॅनॉपी कोसळण्याची भीती आहे.

^ फक्त सात कर्मचारी कायमस्वरूपी आहेत, तर रोजंदारीवर २५ कर्मचारी आहेत. उपलब्ध कर्मचारी गर्दीच्या काळात कमी पडतात. त्यामुळे आम्ही खूप गर्दी असेल त्या दिवशी भुयारी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय रोहनकर, संरक्षण सहायक,भारतीय पुरातत्त्व विभाग

...तर कुतुबमिनार घटनेची पुनरावृत्ती
दिल्लीतीलकुतुबमिनारात डिसेंबर १९८१ रोजी चेंगराचेंगरी झाली होती. सुमारे ४०० पर्यटक मिनाराच्या आत गेले होते. नेमके त्याच वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधार पसरला. मिनार कोसळत असल्याची अफवा पसरली आणि पर्यटक बाहेर पडण्यासाठी सैरावैरा धावू लागल्याने चेंगराचेंगरी होऊन ४५ जण ठार झाले होते. यात बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश होता. दिल्लीप्रमाणेच देवगिरी किल्ल्याच्या भुयारातही असा धोका होण्याची भीती नाशिक येथील काही पर्यटकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...