आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी मंत्रालयासाठी शिवसेना, भाजपची प्रतिष्ठा लागणार पणाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देश आणि राज्यातील सत्तेची सूत्रे हाती असताना जिल्हा पातळीवरील सत्तास्थाने आपल्या हाती असावी, यासाठी भाजपसह शिवसेना पक्षाने रणनीती आखली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्याचा प्रत्यय येणार असून या निवडणुकांत काँग्रेस राष्ट्रवादीपुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेड हा पक्षही रणांगणात उतरणार असल्याने बहुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
मे १९८१ रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात आला. १९९२ पर्यंत प्रशासकीय काळ होता. ११ वर्षांनंतर १९९२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने बाजी मारली. पुढे १९९७ च्या निवडणुकीतही शिवसेना भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, सन २००२ च्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला, तर सन २००७ मध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. सन २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला २६ शिवसेना-भाजपला २२ जागा मिळाल्या. मनसेने आठ जागा काबीज केल्या, तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला होता. कुणाकडेच बहुमत नसल्याने मनसे किंगमेकर ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले. आगामी २०१७ ची निवडणूक मात्र सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीने विधानसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. यात काँग्रेसला यश आले, तर राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका याच धर्तीवर लढवण्याची जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे मनसेचे जिल्हा परिषद अर्थ बांधकाम सभापती संतोष जाधव पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी यांना आपल्या गोटात ओढण्यात काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बहुरंगी लढत होणार
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला आजवर फारसे यश मिळालेे नाही; पण देशात राज्यात सत्ता असल्याने आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण शक्ती पणाला लावणार आहे. शिवसेनाही आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी झटताना दिसून येईल. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. त्यात संभाजी ब्रिगेडबरोबरच बहुजन पार्टी, रिपब्लिकन पक्ष, यासह स्थानिक छोट्या मोठ्या संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक बहुरंगी होणार हे स्पष्ट होते.

संभाजी ब्रिगेडचे आव्हान
पर्यटन राजधानीच्या जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांतून प्लॅन आखला जात आहे. गत निवडणुकीत भाजप-सेनेच्या उमेदवारांना पराभूत करणाऱ्यांचे गट आरक्षणामुळे हिरावले गेले आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठीही डावपेच रंगत आहेत. त्यातच संभाजी ब्रिगेड या नवीन राजकीय पक्षाने आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे आव्हान ठाकले आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत ६० पैकी ३१ जागा कुणालाच मिळाल्या नाहीत. जागा मिळवणारा मनसे हा पक्ष किंगमेकर ठरला. त्यामुळेच मनसेला अर्थ बांधकाम सभापतिपद मिळाले होते; पण विधानसभा निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाला. त्यानंतर पक्षाला गळती लागली असून सभापती संतोष जाधव पंचायत समिती सदस्य गवळी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मनसेला खिंडार पाडले आहे. उर्वरित सात जिल्हा परिषद सदस्यही निराळा मार्ग शोधत आहेत.
बातम्या आणखी आहेत...