आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटगी टाळण्यासाठी मुलांचा वापर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये मुलांचा हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचे अनेक घटस्फोटाच्या प्रकरणांवरून निदर्शनास आले आहे. तसेच घटस्फोटांमागे पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध हेच कारण समोर येत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये पत्नीने पोटगीचा अधिकार सोडावा यावर पती अपत्याचा ताबा पत्नीस देण्यास तयार होताे. दोन ते बारा वर्षे वयाच्या अपत्यांचा ताबा (कस्टडी) मागण्याची अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहेत. बारा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांमध्ये आई किंवा वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाल्याने अशा वेळी अपत्येच आपल्या भवितव्याचा निर्णय घेतात. अनेक पती-पत्नी अपत्याच्या मतास प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले असले तरी प्रमाण अत्यल्प आहे. यासंबंधी “दिव्य मराठी’च्या वतीने कौटुंबिक न्यायालयात दाखल अनेक प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. मध्यस्थ तथा विधिज्ञांचाही सल्ला घेण्यात आला.

पती- पत्नींमध्ये मनोरुग्णता, शारीरिक अपंगत्व अथवा विवाहबाह्य संबंधांमुळे कलह होतो. अलीकडे घरातील थोरामोठ्यांच्या आग्रहाखातर लग्ने लावली जातात, परंतु शिक्षित समाजात अथवा काॅर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांत अल्पावधीतच कलह निर्माण होत असल्याचे चित्र आहे. घटस्फोट, पोटगी आणि अपत्याचा ताबा (कस्टडी) यावरून कुटुंबीय नातेवाइकांमध्ये रस्सीखेच सुरू होते. यामध्ये अपत्याचा हत्यार म्हणून वापर होतो. मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव आजच्या कुटुंबांमध्ये अलीकडे दिसत नसल्याचा अनुभवही अनेक विधिज्ञांनी सांगितला.
वयाची अट पाळली जात नाही

^विवाहासाठीचीवयाची अट पाळली जात नाही. तिशी-पस्तिशीत विवाह होत असल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. प्रेमभंग, भपकेबाज जीवनशैली, इंग्रजी चॅनल्सवरील स्वैराचार आदींमुळे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले यातूनच घटस्फोटाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. -अॅड.अभयसिंह भोसले, वकील, आैरंगाबाद हायकोर्ट.

ताबा मागण्याचे प्रमाण वाढले
^अपत्यांच्या ताब्यासाठीपूर्वी दहा टक्केच मागणी असायची; अलीकडे ९५ टक्के मागणी वाढली असून सणांसाठी भेटण्याची परवानगी मिळावी यासाठीही अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. अपत्यांसंबंधीचा निर्णय आई-वडिलांवर ठेवल्यानेही पालकांना इच्छा नसताना अर्ज करावा लागतो. ५० टक्के प्रकरणांत हे आढळून आले आहे. -अॅड. निशिगंधा चोभे
एक मुलगा झाल्यानंतर संमतीने घटस्फोट ठरला आणि सहा महिन्यांचा अवधी मिळाला. पत्नीने पोटगी मागितली. तिला साडेतीन लाख रुपये आणि मुलगा ताब्यात देण्याचे ठरले. पस्तीस वर्षे वयाच्या पतीचे निधन झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी तीन वर्षांच्या अपत्यास नेले. पत्नी आता हायकोर्टात गेली असून सासू-सासऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने पत्नीस पतीने ३५०० रुपये अंतरिम पाेटगी द्यावी, असे आदेश देण्यात आले. पतीने प्रारंभी पोटगी दिली. नंतर वर्षभर पोटगी दिली नाही. त्यामुळे पतीस जेलची हवा खावी लागली. पुन्हा पोटगी देणे सुरू झाल्यानंतर पती बाहेर आला; पण त्याचे व्यसनाधीनतेमुळे निधन झाले. त्यानंतर पत्नीने न्यायालयाला अथवा आप्तस्वकीयांना कळवता दुसरे लग्न केले. पाच वर्षांच्या अपत्याचा ताबा वडिलांकडे होता. पत्नीने दुसरे लग्न केल्यानंतर अपत्यालाही आपल्या सोबत नेले. आता त्या अपत्याच्या आत्याने मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात धाव घेतली. दावा प्रलंबित आहे.

अपत्य पत्नीकडे होते. घटस्फोट अंतिम टप्प्यात होता. पत्नीच्या नावे एक लाखाची पतीने मुदत ठेव ठेवली .त्या बदल्यात अपत्याचा ताबा मागितला. काही दिवसांत पत्नी कॅन्सरने दगावली; परंतु आता पत्नीचे आई-वडील अपत्याचा ताबा देण्यास तयार नाहीत. न्यायालयानेही वडिलांकडे ताबा देण्यास नकार दिला. शेवटी हायकोर्टाने अपत्याचा ताबा वडिलांना देण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...