बीड - पक्षापेक्षा कोणीही मोठा असूच शकत नाही. अशांनी पक्षातून बाहेर पडून निवडून येऊन दाखवावे. जर पक्षाचा कोणी सौदा करत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. बीडला येऊन हिसाब बरोबर करू, असा इशारा औरंगाबाद येथील एमआयमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बीड येथे शनिवारी पक्षाच्या पत्रकार परिषदेत दिला. बीड नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडीच्या तोंडावर एमआयएमच्या नऊपैकी सात नगरसेवकांनी काकू-नाना विकास आघाडीशी घरोबा केल्याने आमदार जलील यांनी बीड येथे येऊन तातडीची पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका विशद केली. पार्टीशी गद्दारी करणाऱ्या त्या सात नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
बीडमध्ये क्षीरसागरांच्या दोन्ही गटांकडून एमआयएमला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप व शिवसेनेच्या नजरेतूनच आम्ही क्षीरसागरांना पाहतो. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नसून विरोधी बाकावर बसू, हे आम्ही या अाधीच स्पष्ट केलेले आहे. आमच्या सात नवीन नगरसेवकांची काकू-नाना विकास आघाडीने दिशाभूल केली आहे. नगरपालिकेत स्वतंत्र गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करत आहोत, अशी सात नगरसेवकांनी आम्हाला कोणतीच कल्पना दिली नव्हती. गटनेता ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? त्यांनी निवडणूक होताच रंग दाखवले आहेत. पालिकेत विरोधीपक्ष म्हणून बसण्याचा आजही आमचा तोच निर्णय आहे, असेही आमदार जलील यांनी या वेळी सांगितले.
असदुद्दीन जलसा घेतील
पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. आम्ही सातही नगरसेवकावर कारवाई करू, परंतु पालिकेत आम्ही विरोधीपक्ष म्हणून राहण्याचा आमचा निर्णय बदलणार नाही. ज्या भागातील नगरसवेकांनी एमआयएमवर प्रेम करून नगरसेवकांना निवडून दिले. त्या भागात जाऊन आम्ही जलसा घेऊ सामान्य लोकात पुन्हा एक विश्वास निर्माण करू, असे आमदार जलील यांनी सांगितले.
क्षीरसागर आमच्याही दारात आले होते
बीड नगरपालिकेत एमआयएमने बरोबर यावे म्हणून क्षीरसागर आमच्याही दारात आले होते. परंतु आम्ही आमची भूमिका कायम ठेवली आहे. पैशाकडे पाहून ज्या लालची नगरसेवकांनी काकू-नाना विकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांना भविष्यात महागात पडणार आहे.
नगरसेवकांची गद्दारी खपवून घेणार नाही
एमआयएमचे सात नगरसेवक जर कुठल्या कारणाने नाराज असतील तर त्यांनी औरंगाबाद, हैदराबादला यावे, चर्चा करावी. यायचेच नसेल तर हैदराबाद व औरंगाबादला बीडला येऊन हिसाब बरोबर करावा लागेल. बीडमधील मुस्लिम मतदार नगरसेवकांची अशी गद्दारी खपवून घेणार नाही.