आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीचे फुटेज देण्यासाठी विद्यापीठाला लागले 6 दिवस, भाजयुमोचे 4 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजयुमोच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. - Divya Marathi
भाजयुमोच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
औरंगाबाद- विद्यापीठात ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या हाणामारीविषयी फिर्याद देण्यासाठी विद्यापीठाला तब्बल सहा दिवस लागले. गुरुवारी रात्री विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी (६०) यांनी रात्री आठच्या सुमारास फिर्याद दिली. त्यानुसार राडा करून कार्यक्रम उधळून लावणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या २० ते २५ तरुणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे यांनी दिली. 

परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत कार्यक्रम उधळून लावणारे आणि तोडफोड करणारे तरुण दोन संघटनांचे असल्याचे नमूद केले आहे. बहुजन क्रांती मोर्चा आणि भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनांचा उल्लेख आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावरून हा वाद झाला होता. पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे होते. 

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी बहुजन क्रांती मोर्चाचे युवा कार्यकर्ते सभागृहात आले आणि घोषणाबाजी केली. माइकचा ताबा मिळवत कार्यक्रम बंद पाडला. या वेळी कुलगुरू चोपडे यांनी या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते म्हणून “आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चा करू’ असे म्हणत त्यांना तिकडे नेण्यात आले. ही माहिती भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी या कॉन्फरन्स हॉलकडे धाव घेतली. या वेळी या रूमचा दरवाजा लावला होता. तो दरवाजा तोडत या कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. दोन्ही गटांत हाणामारीला सुरुवात झाली. सामानाची तोडफोड झाली. हा सर्व प्रकार कुलगुरूंच्या समोर झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे हा सारा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तोडफोडप्रकरणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांचा बेगमपुरा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. व्याख्यान उधळून लावल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद कक्षाच्या दरवाजाची तोडफोड केल्याचे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषद कक्षाची तोडफोड केल्याच्या घटनेला आता आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मोराळे यांचा जबाब नोंदवला आहे. 

दुपारी दीडच्या सुमारास पोलिस अधिकारी दीपक औटे डॉ. मोराळे यांच्या कार्यालयात आले, त्यांनी जबाब नोंदवून घेतला आहे. जबाबामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. अज्ञातांनी तोडफोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचीही तपासी अधिकारी राहुल रोडे यांनी सायंकाळी भेट घेतली. त्या वेळी डॉ. मोराळे, डॉ. जब्दे आणि रोडे यांच्यामध्ये सुमारे दीड तास कुलसचिवांच्या अँटीचेंबरमध्ये चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र बाहेर येऊ शकला नाही. रोडे यांनी सीसीटीव्हीची मागणी केली होती, दुपारी विद्यापीठ प्रशासनाने फुटेज पोलिसांना स्वाधीन केल्याची माहिती आहे. कुलसचिवांनी पोलिस तपासावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

पाच आरोपींना १८ पर्यंत पोलिस कोठडी 
आमदारअतुल सावे यांच्या सिडकोतील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तर यांनी १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे अादेश न्यायालयाने आदेश दिले. गुरुवारी दुपारी पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बजरंग चौकातील सावे यांच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करत बॅनर काढून रस्त्यावर फेकले. या प्रकरणात फिर्यादी राजा बाबासाहेब भुजबळ (२१, गल्ली नं. १, हनुमाननगर) यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन सत्तू तिवारी (३२, रा. नागेश् वरवाडी), किरण रमेश तुपे (२३, रा. पंचशीलनगर), राहुल श्रीराम घेवंदे (३१, रा. संजयनगर, मुकुंदवाडी), दीपक चंद्रभान केदार (३२, रा. चिकलठाणा) आणि विशाल गोपीनाथ नवगिरे (२२, रा. रमानगर) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४२७ भादंविसह कलम क्रिमिनल अॅमेंडमेंट कायदा १३५ मपोका यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपींचा उद्देश काय होता याची विचारपूस करणे, आणखी साथीदार आहेत काय याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. 

घटनेनंतर चिथावणी देणाऱ्यांचे काय? 
याप्रकरणी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करून जमावबंदी मोडल्याचेही म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही म्हटले आहे. मात्र हा कार्यक्रम नियोजित होता. तो उधळून लावण्याचा कटही नियोजित होता. कार्यक्रम उधळून लावल्यानंतर चिथावणी देऊन इतर कार्यकर्त्यांना बोलावून हाणामारी करण्याचाही प्रकार झाला. 

कुलसचिवांकडे अभाविपची तक्रार 
अखिलभारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री स्वप्निल बेगडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कुलसचिवांना एक निवेदन देण्यात आले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उधळून लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या गुंडांनी कार्यक्रम उधळून लावला असून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निखिल आठवले, भागमंत्री विवेक पवार, अजित चाटे, पंकज लोखंडे, दीक्षा पवार, रोहित लांडगे, निखिल साबळे, किरण जाधव, तुषार कठाळे आदींनी दिला आहे. 

का लागले सहा दिवस? 
११फेब्रुवारी रोजी सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी व्हावी, असा केवळ तक्रार अर्ज दिला होता. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद हवी असते. ती फिर्याद पोलिसांना गुरुवारी रात्री मिळाली. त्यानंतर तपास कार्य सुरू झाले, अशी माहिती उपनिरीक्षक रोडे यांनी दिली. फिर्याद आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास सहा दिवस का लागले, विद्यापीठ प्रशासनावर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काही राजकीय दबाव होता का, असे सवाल विचारले जात आहेत. 
 
भाजयुमोचे चार कार्यकर्ते ताब्यात 
शुक्रवारीसंध्याकाळपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या चार कार्यकर्त्यांना बेगमपुरा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावत ताब्यात घेतले. यात सचिन सुमीत झवेरी, मयूर वंजारी, कुणाल मराठे, सुभाष पांगडे यांचा समावेश आहे. विद्यापीठाने दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून काहींना ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात अभाविपच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश असू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

पुढील स्लाइडवर वाचा विद्यापीठात वर्षाला एक कोटीपेक्षा जास्त रक्कम सुरक्षेवर खर्च, तरीही होते तोडफोड...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...