आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या प्रशासनाला मंत्रालयातील पत्राची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांना उच्च शिक्षण संचालकपदावरून निलंबित केल्यानंतर आता बोगस नियुक्ती केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी (७ एप्रिल) दिवसभर विद्यापीठात डॉ. माने यांच्या निलंबनाचीच चर्चा होती. दरम्यान, मंत्रालयातून अद्याप कुठल्याही प्रकारचे पत्र आले नसल्याचे स्पष्टीकरण कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी दिले आहे.
 
गुरुवारी डॉ. माने यांना विधानसभेत निलंबित केल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर कुलसचिव डॉ. जब्दे यांची गुरुवारी पत्रकारांनी भेट घेतली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून अद्याप काहीही पत्र आलेले नाही. डॉ. माने कुलसचिव असतानाच त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. सर्व तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन उच्च शिक्षण संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी चौकशी समिती गठित केली होती. पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयातील सहसंचालक व्ही. आर. मोरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. या समितीत औरंगाबादेतील त्या वेळचे प्रभारी सहसंचालक डॉ. बळीराम लहाने, हरिभाऊ शिंदे यांचाही समितीत समावेश होता. या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल थेट संचालक कार्यालयामार्फत राज्य सरकारला सादर केला होता. त्यामुळे विद्यापीठात त्याची काहीच माहिती नाही.’ राज्य सरकारच्या निर्देशानुसार विद्यापीठ पुढील कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्यांच्या नियुक्त्यांमुळे डॉ. माने यांच्यावर निलंबनाची वेळ आली अशा बोगस अधिकारी आणि प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहेत.
 
डॉ.रमेश जाधव यांच्या चौकशीसाठी समिती: मराठीविभागाचे प्राध्यापक डॉ. रमेश जाधव यांच्याविरोधात विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठीदेखील त्रिसदस्यीय समितीचे गठन केल्याचे डॉ. जब्दे यांनी सांगितले. डॉ. सुरेश गायकवाड समितीचे अध्यक्ष असून प्रा. डॉ. सतीश दांडगे आणि डॉ. भगवान साखळे सदस्य आहेत. समितीने कामाला सुरुवात केलेली नाही.
 
बातम्या आणखी आहेत...