आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ दुष्काळ जाहीर करा, छावा युवा संघटनेचा विभागीय आयुक्तालयावर बैलगाडी मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद- मराठवाड्यातसलग पाचव्यांदा भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे खरिपातील पिकांचे ७० टक्के नुकसान झाले. उत्पादन खर्च वाया गेला. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत प्रेम प्रकरणातून शेतकरी आत्महत्या होत असल्याचे सांगून अवहेलना केली. याचा निषेध करण्यासाठी मराठवाड्यात सरकारने विनाविलंब तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, पीक कर्ज, वीजबिल आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात पाच बैल गाड्यांचा समावेश होता. राज्यभरातून आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हाती भगवे ध्वज आणि पोस्टर्स होते. पोस्टर्सवर संपूर्ण कर्जमुक्ती हवी. दुष्काळ जाहीर करा. गावागावांत चारा छावणी सुरू करावी. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा यावा. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे. भूमी अधिग्रहण कायदा लागू करू नये. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. डीएमआयसीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीत प्राधान्य द्यावे. शैक्षणिक फी माफी करावी. अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या. यासंदर्भातील निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, केंद्रीय मुख्य संघटक अप्पासाहेब कुढेकर, संपर्कप्रमुख रमेश केरे, जिल्हाध्यक्ष शिवाजी मार्कंड पाटील, किशोर शिरवत उपस्थित होते. मनीष पोळ, सचिन मिसाळ, मनोहर सनेर, अमोल काळे, विवेक वाकोडे, बाळासाहेब भुमे, दत्ता वाघचौरे, किशोर सदावर्ते, प्रशांत ब्रह्मराक्षस, बाबूराव मोरे, अरुण गायके, अप्पासाहेब हावळे, शुभम केरे, सचिन प्रधान, शिवनाथ काळे, डॉ. सोमनाथ शिंदे, अप्पासाहेब पाटोदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही
मोर्चानंतरजावळे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, विमा रक्कम, सिंचन अनुदान, दुबार पेरणी अनुदान आदी अनुदान कागदावर ठेवले आहेत. बहुतांश शेतकरी यापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्र्यांना प्रेम प्रकरणाचे एकच कारण कसे कळले. इतर गंभीर समस्यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. याची ते प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहणी करून माहिती घ्यावी. मात्र, अवमानकारक बोलू नये. ते खपून घेतले जाणार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी भेदभाव बाळगता, राजकारण करता शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.