आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिकले ते हुकले’ची भावना अशिक्षितांमध्ये रुजत चालली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : माणसाला हक्कांची जाणीव घडवणारे शिक्षण फुले दांपत्यांनी दिले. आता मात्र परंपरागत बुरसटलेल्या शिक्षणातून ‘आदर्श गुलाम’ घडवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ‘शिकले ते हुकले’ अशी खंत अशिक्षितांमध्ये रुजत असल्याचे मत परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक प्रा. श्याम मुडे यांनी व्यक्त केली. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पदव्युत्तर विभागातर्फे मंगळवारी (३ जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
 
अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे होते. ‘सावित्रीबाई फुले विचारकार्य सद्य:स्थिती’ या विषयावर बोलताना प्रा. मुडे म्हणाले, ‘आज देशातील सामाजिक वातावरण जाती-धर्मात अडकवण्याचे काम केले जात आहे. 
 
माणसं दगडाला देव मानून नतमस्तक होत आहेत, मात्र माणसातला माणूस मानायला तयार नाहीत, इतकी सामाजिक परिस्थिती लयाला गेली आहे. अशा वेळी फुले-शाहू-डॉ. आंबडेकरांच्या चळवळीचा आदर्श वारसा सांगण्याऐवजी तथ्यहीन बुद्धिभ्रष्ट वाचायला, ऐकायला, पाहायला मिळत आहे.
 
 अशा वेळी सावित्रीबाई फुलेंचे समतावादी विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे मतही प्रा. मुडे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जब्दे म्हणाले, ‘सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्यामुळेच भारतात स्त्रिया शिकल्या आणि आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत.’ प्रा. निर्मला जाधव यांनी प्रास्ताविक केले.
 
 बाबासाहेब मदन यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विलास इप्पर यांनी आभार मानले. या वेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांच्यासह विद्यार्थी, रासेयोचे स्वयंसेवक आणि प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
 
समता पदयात्रा काढून केले अभिवादन 
सावित्रीबाईफुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विद्यापीठातर्फे समता शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीला विद्यापीठ प्रवेशद्वारापासून सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. सावित्रीबाई फुलेंच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. साडेअकरादरम्यान मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...