आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीपी घोटाळ्यात सहायक अभियंत्यासह १ निलंबित, डीटीसी कनेक्शन नसतानाही रोहित्रे मंजूर करून त्याची हेराफेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- महावितरण कंपनीच्या कन्नड येथील भांडार विभागातून रोहित्रे आणून ती खासगी व्यक्तीमार्फत बसविण्याचा उद्योग तालुक्यातील ग्रामीण भागात राजरोसपणे सुरू आहे. डीटीसी कनेक्शन नसतानाही रोहित्रे मंजूर करून त्याची हेराफेरी करणारे महावितरणचे सहायक अभियंता नामदेव केंद्रे व मुख्य तंत्रज्ञ अशोक शिंदे या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी खासगी व्यक्तींना हाताशी धरून रोहित्रांची अदलाबदल करत आपले उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटा लावला होता. यामुळे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.  येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता उपविभाग क्र. २ अंतर्गत येणाऱ्या शिऊर व गारज उपकेंद्रात रोहित्रांचा मोठा घोटाळा झाला आहे. 

शिऊर उपकेंद्रातील काही गावांत खासगी ठिकाणी रोहित्रे पडून असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कन्नड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी मागील महिन्यात या भागात तपासणी मोहीम सुरू केली होती. त्यांच्या या तपासणीत त्यांना तालुक्यातील खरज येथील कुंदे व बागूल वस्तीवर रोहित्रे आढळून आली होती. त्यांनी या रोहित्राबाबत संबंधितांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे राजपूत यांनी या सर्व प्रकरणाचा बारकाईने तपास केला असता येथील उपविभागातील सहायक अभियंता असलेल्या नामदेव केंद्रे यांनी त्यांच्या अखत्यारीत नसतानाही कार्यालयातील मुख्य तंत्रज्ञ अशोक शिंदे व कुंदे नामक खासगी व्यक्तीमार्फत कन्नड येथील कार्यालयातून रोहित्रे आणली होती. ही रोहित्रे भांडार विभागात नेण्याऐवजी ती थेट या जागेवर उतरविण्यात आली होती. 

रोहित्रांच्या गेटपासवर शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या
कन्नड येथील भांडार विभागातून मंजूर झालेल्या या रोहित्रांच्या गेटपासवर शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रोहित्रांचा हा घोटाळा उघडकीस आल्यावर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी वैजापूर उपविभाग क्र. दोनमधील सहायक अभियंता नामदेव केंद्रे व मुख्य तंत्रज्ञ अशोक शिंदे यांना तडकाफडकी निलंबित केले.
 
बातम्या आणखी आहेत...