आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत वीज बिल वसुलीत कसूर; वेतन कपात होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परिमंडळातील ग्राहकांना वीज पुरवली जाते. त्या प्रमाणात शंभर टक्के वीजबिलाची रक्कम वसूल केली जात नाही. परिणामी थकबाकीचे प्रमाण वाढत चालले असून महावितरणची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी आता संबंधित शाखा अभियंते व कर्मचाऱ्यांना दोषी धरले जात आहे.  तसा इशारा वेळोवेळी देण्यात आला होता. मात्र, त्याकडे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने अजिंठा, कन्नड आणि पिशोर उपविभागांतील १७५ वीज कर्मचाऱ्यांचे ५० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय औरंगाबाद परिमंडळ प्रशासनाने घेतला आहे. वेळेच्या वेळेत संपूर्ण वीजबिलाची रक्कम वसूल करावी, अन्यथा अशाच प्रकारे कारवाई होणार असल्याचे माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

 गणेशकर म्हणाले की, परिमंडळातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीज चोरी ४० टक्क्यांवर आहे. थकबाकीचे प्रमाण प्रमाणाबाहेर गेले आहे. यात सुधारणा करणे अनिवार्य आहे. जेवढी वीज वितरित केली जाते, तेवढी रक्कम वसूल होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित शाखा कार्यालयातील अभियंते, कर्मचाऱ्यांनी काम करावे. यामध्ये कसूर करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठीच हे कठोर पाऊल उचलले आहे. 
 
वीज चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सहा पथक स्थापन   
शहरातील शहागंज, सिल्लेखाना, चिकलठाणा, मसनतपूर, छावणी, गारखेडा परिसर, मुकुंदवाडी, राजनगर, सातारा देवळाई, बीड बायपास यासह शहराच्या प्रमुख भाग, कारखान्यात चोरून वीज वापरली जात आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी सहा पथक स्थापन करण्यात आली आहे. गाळणी विभाग, कॉलिटी कंट्रोल, मीटर टेस्टिंग, अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचा पथकात समावेश असणार आहे. वीज चोरी पकडणे व कारवाई करणे अशा प्रकारे जबाबदारी पथकावर सोपवली आहे.   

जेथे उघडी डीपी तेथील अभियंत्याचे निलंबन
मंगळवारी नारेगाव येथे एका व्यक्तीला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारे उघड्या डीपी जीवघेण्या ठरत आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उघड्या डीपींना संरक्षक वॉल अथवा भिंती घालण्याचे आदेश देऊन वर्ष होत आले आहे. तसेच ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत निर्णय झाला होता. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसे निर्देश दिले होते. तरी देखील उघड्या डीपी का झाकल्या जात नाहीत, याबाबत गणेशकर यांना विचारणा केली असता, ज्या ठिकाणी उघडी डीपी दिसेल तेथील अभियंत्याचे निलंबन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

३ हजार ८४० युनिट वीज चोरी थांबवण्यात यश   
वीज चोरांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. जसवंतपुरा फीडरवर वीज चोरी पकडून ३ हजार ८४० युनिट वीज चोरी थांबवण्यात यश आले आहे. म्हणजेच दररोज २२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान थांबवण्यात आले आहे.