आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत घरगुती मीटरमधून वीजचोरीचे सर्किट तयार करणारा सूत्रधार गजाआड, 7 जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरगुती मीटरची रीडिंग थांबवून वीजचोरी करण्यासाठीचे सर्किट बनवणारी टोळी शहर पोलिस आणि महावितरणने उघडकीस आणली आहे. शुक्रवारी दिवसभर शहरातील २२ जणांवर कारवाई करण्यात आली तर सात जणांना अटक करण्यात आली. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा हर्सूल येथील किशोर रमेश राईकवार हा यातील मुख्य सूत्रधार अाहे. शनिवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
 
राज्यभरात हजारो मीटर्सवर अशी वीजचोरी होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. वीजचोरीचा हा तपास ठाणेनिहाय होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.  सध्या हर्सूल, जिन्सी आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत. 
 
कायम एकसारखी रीडिंग : महावितरणच्या औरंगाबाद विभागाचे  सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की, कायम सारखी रीडिंग येणाऱ्या संशयित मीटरवर महावितरणने लक्ष ठेवले होते. तेव्हा ही मीटरची चोरी उघडकीस आली. या वेळी उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे उपस्थित होते.
 
सर्किट तयार करणारा केवळ १०वी पास : सर्किट तयार करणारा आरोपी किशोर केवळ दहावी पास असून तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. तो मूळ अमरावतीचा आहे. १२ वर्षांपासून तो औरंगाबादेत असून दोन वर्षांपासून तो हे काम करतो. उद्योग क्षेत्रात हे सर्किट वापरले जात नाही. कारण कारखान्यातील मीटर महावितरणशी इंटरनेटने जोडलेले असते. महावितरणचे त्याकडे कायम लक्ष असते.
 
यांच्यावर गुन्हे दाखल  
प्रकाश देवराव गायकवाड, अनिल गिताराम नवले (सुरेवाडी), मंगला वाघ (मयूर पार्क), मारुती जयराम पवार (सिडको), सदाशिव बाबुलाल राठोड, मीना राधेश्याम वर्मा  (एन-११), जफर शहा अमिन शहा (जिन्सी), मोहन रमेश हरणे (हर्सूल), मधुकर नामदेव गोरे, सुरेश हिंमत सुरे (जाधववाडी), सोनाजी रामचंद्र बमने, धनाजी धोंडिबा दुबे (हर्सूल), शेख रशीद शेख गफूर (रा. कोलठाणवाडी), रुक्मिणी पौडवाल, आय. आर. पटेल-१३) (एन-१३), शेख रसूल शेख लाल पटेल, कचरू धनाजी दुबे, शेख रौफ उमर पटेल, ज्ञानेश्वर जनार्दन औताडे, गजराबाई भाऊसिंग बमने (सर्व रा. हर्सूल), अंतकला शंकर ढाकणे (एन-६) यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. अशी वीजचोरी करणाऱ्यांवर कलम ४२०, ४६८, ४७१,४२७, ३४, सह भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त यादव यांनी सांगितले. शुक्रवारची कारवाई निरीक्षक सुरेश वानखेडे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, विजय जाधव, अनिल वाघ, महावितरणचे सचिन लालसरे, गणेश जाधव, अविनाश चव्हाण यांच्या पथकाने केली.
 
१४ हजार कोटींच्या नुकसानीचा दावा
औरंगाबाद विभागासाठी नोव्हेंबर २०१६ ते मे २०१७ या काळात ४ हजार ४१० दशलक्ष युनिट वीज देण्यात आली. प्रत्यक्षात २ हजार २०० दशलक्ष युनिटचेच पैसे महावितरणकडे आले. निम्म्या विजेचा हिशेबच लागला नाही. यात वीज गळती, वीजचोरी, मीटर बिघाड, रीडिंग मोजण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा प्रकार होतो. यामुळे गेल्या वर्षभरात सुमारे १४ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे बकोरिया यांनी सांगितले. याचा तपास करण्यासाठी प्रत्येक महिन्याला एकसारख्या युनिट विजेचा वापर करणाऱ्या मीटरची यादी करण्यात आली. त्यातील सुमारे पाच टक्के मीटरची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली तेव्हा हा घोटाळा समोर आला.
 
यांना झाली अटक 
किशोर रमेश राईकवार, प्रकाश देवराव गायकवाड, अनिल गिताराम नवले (सर्व रा. सुरेवाडी), सुरेश हिंमत सुरे (जाधववाडी), मारुती जयराम पवार (एन-१३), सदाशिव बाबुलाल राठोड (एन-११), जफर शहा अमिन शहा (जिन्सी) यांना अटक करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...