आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीची पार्श्वभूमी राहिलेल्या भागात विकासासाठी सौहार्द!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकेकाळचा दंगलप्रवण आणि आताचा संवेदनशील भाग असलेल्या बायजीपुरा ते राजाबारपर्यंतच्या हिंदू -मुस्लिमबहुल वस्तीच्या भागात मनपाने रस्त्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी सुरू केली. सकाळी ११ वाजता १५० वर्षे जुने लक्ष्मीदेवीचे मंदिर हटवण्यावरून नगरसेवक फिरोज खान आणि मंदिराचे ट्रस्टी, नागरिकांमध्ये विसंवाद सुरू होता. मात्र, आमदार इम्तियाज जलीलसह शिवसेनेचे संतोष जेजूरकर यांच्या मध्यस्थीने विसंवाद मिटला.
विकासाच्या कामात पुढाकार घेऊन काही नागरिक स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेताना दिसून आले.
१९८८ मध्ये बायजीपुऱ्यात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगल उसळली होती. यात एका जणाचा खून झाला होता. तसेच हजारो जखमी झाले होते. तेव्हापासून या भागात ये-जा करणारे जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. अनेकांनी आपले रस्तेच बदलले होते. तेव्हाची परिस्थिती आणि आज थोड्याशा विसंवादानंतर पुन्हा सर्वांनी संगनमताने हा प्रश्न सोडवला. मंदिराची दुसरीकडे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फिरोज खान यांनीच पुढाकार घेऊन पर्यायी जागा दिल्याचे दिसून आले. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ते बायजीपुऱ्यातील गंजेशहिदा मशिदीपर्यंत ४५ फूट रस्ता तयार करण्यात येणार आहे. आजपासून मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सकाळी ११ वाजता बाधित होणाऱ्या १५० मालमत्ता काढण्यासाठी मोहीम सुरू केली होती. पथकाने मनपाच्या शाळेजवळील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. यात शाळेतील लक्ष्मीचे मंदिर काढण्यासाठी खान यांनी पुढाकार घेतला होता. यात मंदिराच्या ट्रस्टींसह नागरिकांनी पथकाला विरोध केला. त्यामुळे पथकाने मोकळ्या जागेतील माती काढण्यात दिवस घालवला. दरम्यान, ट्रस्टींसह नागरिकांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी मागून विधिवत पूजा करून देवीची प्राणप्रतिष्ठा इतरत्र करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. यावा खान यांनी सुरुवातीला विरोध करून आताच मंदिर हलविण्याचा हेका धरला होता. या वेळी जेजूरकरांनी प्रशासनाकडून वेळ मागून घेतली, तर आमदार जलील यांनी नगरसेवक आणि नागरिकांशी चर्चा केली. या वेळी ट्रस्टीची मागणी लक्षात घेऊन जलील यांनी दोन-तीन दिवसांत विधिवत पूजा करून आपणच आपल्या हाताने मंदिर हलवण्याचे सांगितले. त्या वेळी नगसेवक खान यांनी बाजार समितीची जागा मंदिरास उपलब्ध करून देऊन ओटा तयार करून देण्याचेही आश्वासन दिले. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

भाडेकरूंच्या कटकटीसह नागरिकांनी दिले विकासाला प्राधान्य : शहरातीलजुनी वस्ती असल्याने येथे जुन्या इमारतीतच नागरिक राहत होते. तसेच अनेकांनी भाडेकरूही ठेवले आहे. ज्यांना भाडेकरूची अडचण होती, त्यांची ही कटकट या मोहिमेमुळे संपली आहे. तसेच नागरिकांनी टीडीआर कधी मिळेल याची शाश्वती नसतानाही विकासासाठी पुढाकार घेऊन मालमत्ता पाडण्यास प्राधान्य दिले.

१९७५ चा डीपी प्लॅन
त्याचा १९७५ च्या शहर विकास आराखडयात या रस्ता रूंदीकरणाचा २००२ मध्ये आराखड्यात दुरूस्ती करण्यात आली, त्यातही या रस्त्याचा समावेश होता. जुन्या शहरातील असे १६ रस्ते काढण्यासाठी मनपाने महिनाभरापूर्वी जाहीर प्रगटन दिले होते. तसेच काही नागरिकांना नोटिसाही दिल्या होत्या. आजही नगररचना,अतिक्रमण विभागाने ज्यांना नोटिसा दिल्या नाहीत, त्यांना नोटीस देऊन मार्किंगचे काम केले.

सकाळपासून उकरली माती
सकाळी अकरा वाजता या भागात पोहोचलेल्या मनपाच्या पथकाने जिन्सी भागातील मनपाच्या शाळेच्या बाजूला बाजार समितीच्या जागेवर असलेली माती काढण्याचे काम सुरू केले. सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेसीबीकडून केवळ येथील माती उकरून बाजूला टाकण्याचे काम करण्यात आले. एकाही घराला हात लावला नाही. मात्र, नागरिक स्वत:हूनच मालमत्ता काढून घेत होते.

लोकांना फायदा
जुन्या शहरासह हडको-सिडकोवासीयांना थेट संस्थान गणपती, शहागंज भागात पोहोचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्याचा दररोज किमान ८० हजार लोकांना फायदा होणार आहे. त्यादृष्टीने मनपा हा रस्ता करत आहे. मशिदीपासून खास गेटपर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...