आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंड्युरन्सचा शेअर बाजारात धमाका, आयपीओतून कंपनीने उभारले ११६१ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील विख्यात इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज कंपनीने मुंबई शेअर बाजारात नोंदणीच्या पहिल्याच दिवशी धमाका केला. कंपनीचा आयपीओ ४४ पटीने ओव्हरसबस्क्राइब झाला होता. मुंबई शेअर बाजारात बुधवारी इंड्युरन्सची लिस्टिंग झाली. त्या वेळी गुंतवणूकदारांच्या या समभागावर उड्या पडल्या. दिवसअखेर इंड्युरन्सचा समभाग इश्यू प्राइसपेक्षा ३७ टक्क्यांनी वधारून बंद झाला.

दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीत अग्रस्थानी असलेल्या इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज कंपनीने पाच ते सात ऑक्टोबर २०१६ या काळात सार्वजनिक प्राथमिक विक्री (आयपीओ) करत शेअर बाजारात प्रवेश केला. आयपीओसाठी ४६७ ते ४७२ रुपये असा दरपट्टा निश्चित केला होता. त्या वेळी कंपनीच्या आयपीओला ४४ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. आयपीओच्या माध्यमातून इंड्युरन्सने ११६१ कोटी रुपये उभारले. बुधवारी इंड्युरन्सचा शेअर बाजारात खुला झाला तो ५७० रुपयांवर. त्यानंतर गुंतवणूकदारांनी इंड्युरन्सच्या समभागाची जोरदार खरेदी केली. मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर हा समभाग ३७.२२ टक्क्यांनी वधारून ६४७.७० रुपयांवर बंद झाला. इंट्रा डे व्यवहारात हा समभाग ६५५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मुंबई शेअर बाजारात दिवसभरात कंपनीच्या ८१.४१ लाख समभागांचे व्यवहार झाले. इंड्युरन्सचे वाळूज, इटली आणि जर्मनी येथे प्रकल्प आहेत.

धन्यवाद...
^इंड्युन्सने शेअर बाजारात धमाकेदार पाऊल ठेवले आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेलो. त्याबद्दल आमच्या तमाम गुंतवणूकदारांचे धन्यवाद. मला खात्री आहे की, आम्ही त्यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करू शकतो.
अनुरंग जैन, एमडी, इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज
बातम्या आणखी आहेत...