आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक : बनावट विमा दाखवून बारा दिवसांत लाटले 60 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बनावट अपघात विमा प्रकरणात तक्रारदार असलेला विमा कंपनीचा अधिकारी देखील दोषी असल्याचे आणि या रॅकेटच्या सदस्यांनी शेवटच्या १२ दिवसांत तब्बल साठ लाख रुपये विम्याची रक्कम उचलली असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे पोलिस, डॉक्टर, वकील आणि विमा कर्मचाऱ्यांसह ३० जणांचे रॅकेट या प्रकरणात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. 
 
या प्रकरणात आरोपींची यादी वाढतच आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देताच आरोपींच्या यादीत दोन पोलिस हवालदार आणि एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव जोडले गेले आहे. या आठवड्यात या प्रकरणाचा तपास वेदांतनगर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. प्रथमदर्शनी यात ३० आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यात पोलिस कर्मचारी, वकील, डॉक्टर आणि विमा कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. अटकेत असलेल्या लतीफने ही माहिती दिल्याचे तपासात पुढे आले आहे. उपनिरीक्षक खंडागळे यांनी तपासाची चक्रे फिरवताच फिर्यादी सतीश अवचार याला या बनावट विमा प्रकरणाची पहिल्यापासूनच माहिती असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याचा आरोपीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. छावणी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल मुक्तार शेख बक्कल नंबर १०३८ उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील आर. डी. नरवडे बक्कल नंबर १०३८ यांनाही आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. 
 
खोटा पंचनामा आणि अस्तित्वात नसलेले डॉक्टर 
अपघात झाल्यानंतर विमा कंपनीत बनावट कागदपत्रांआधारे दावे दाखल करून जखमींवर अस्तित्वात नसलेल्या दवाखान्यात उपचार केल्याचे दर्शवण्यात आले होते. या प्रकरणात फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्रिमूर्ती चौकातील मोहरीर हॉस्पिटलचे डॉ. महेश मोहरीर, जमादार आर. आर. शेख विमा एजंट शेख लतीफ शेख अब्दुल यांना अटक केली होती. एजंट लतीफच्या मदतीने अवचार यांनी रक्कम मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याचप्रमाणे छावणी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल शेख उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील नरवडे हेदेखील अपघाताचे खोटे पंचनामे करत होते, असे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे घडलेला अपघात घडल्याचे दाखवण्यासाठी अस्तित्वात नसलेले दवाखाने, डॉक्टर उभे करण्यात आले होते. या टोळीने बनावट कागदपत्रे सादर करून ३२ केसेस दाव्यांसाठी दाखल केल्या. यात वीस दाव्यांमध्ये त्यांनी साठ लाख रुपये विमा कंपनीकडून उकळले आहेत. अवघ्या पंधरा ते बावीस दिवसांत त्यांनी ही रक्कम कंपनीकडून उकळल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 
 
सात फेब्रवारीच्या अंकातील वृत्त. 
या रॅकेटमध्ये प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला होता. खोटे पंचनामे करण्यासाठी पोलिसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळत होते, तर डॉक्टरांना तीस हजार रुपये मिळत, वकील, विमा कर्मचारी यांचाही हिस्सा ३० हजार रुपयांपर्यंत होता, असे लतीफने तपासात सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...