आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरीच्या समस्येवरील उपाय, आंतरमशागतीसाठी हस्तचलित सायकल कोळपे ठरले वरदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेबूबखेडा : महिला शेतकरी कोळपे चालवताना. - Divya Marathi
महेबूबखेडा : महिला शेतकरी कोळपे चालवताना.
औरंगाबाद- परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आंतरमशागतीसाठी हस्तचलित सायकल कोळपे तयार केले आहे. महिलाही हे कोळपे सहज चालवू शकतात. एका दिवसात एक एकर कोळपणी करता येते. यामुळे १८ टक्के श्रमभार तर ४१ टक्के ऊर्जा बचत होते. कमी खर्चात मजुरांच्या समस्या व त्यावर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होत असल्याने सध्या सायकल कोळपे चर्चेत आले आहे.

आता मशागतीपासून ते पीक मळणी व साठवण्यापर्यंतची सर्व कामे यंत्रांमार्फत केली जात आहेत. बैलजोडी, लाकडी वखर, तिफणीची जागा ट्रॅक्टर, पॉवर टिलर आदी नवनवीन तंत्रज्ञानाने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पिकातील गवत काढणे, कोळपणी करण्यासाठी मजुरांची वानवा आहे. त्यामुळे मजुरीही दुपटी-तिपटीने वाढली आहे. या समस्येमुळे वेळेवर मशागत होत नाही. परिणामी उत्पादन घटते. उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी मिळते. यावर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठाने आंतरमशागतीसाठी हस्तचलित सायकल कोळपे विकसित केले आहे.पुरूष, महिला दोघांनाही ते चालवणे सोपे आहे. मजुरीचा खर्च ५० टक्क्यांपेक्षा कमी करता येत असल्याने शेतकरी त्याला अधिक पसंती देत असल्याचे, माहिती कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार, विषय विशेषज्ञ प्रा. दिप्ती पाटगांवकर यांनी सांगितले.

प्रात्यक्षिकातून निष्कर्ष : विद्यापीठ आणि औरंगाबादेतील पैठण रोडस्थित कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाच्या वतीने दोन वर्षांपासून प्रात्यक्षिकद्वारे सायकल कोळप्याचे फायदे व तोटे तपासले जात आहे. पारंपरिक खुरपणीची तुलनेत या सायकल कोळप्याने महिलांचे शारिरीक ऊर्जा व्यय ४१ टक्के तर श्रमभार १८ टक्क्यांनी कमी होतो. एका दिवसांत एक एकर शेतीची कोळपणी करता येते. उत्पादन खर्च व वेळेची बचत होत असल्याचे डॉ. पवार व प्रा. पाटगांवकर यांनी सांगितले.

तोटा : जास्त तणात कोळपे निरुपयोगी ठरते. त्यासाठी कमी तणात कोळपणी करणे आवश्यक आहे.
फायदा : एक एकर शेतातील खुरपणी करण्यासाठी सहा महिला व दीडशे रूपये मजुरीप्रमाणे ९०० रूपये खर्च, श्रम लागतात. बैलाद्वारे कोळपणीसाठी एकरी ५०० ते ६०० रूपये खर्च येतो. तेच काम एक महिला सायकल कोळप्याद्वारे करू शकते. पावसाने दांडी मारल्यास कोळपे हाणून जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकूण ठेवण्यासाठी फायदा होतो. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर.
असे आहे सायकल कोळपे
सायकल कोळप्याला लोखंडी चाक असून मागील बाजूस तण काढण्यासाठी, जमिनीत हवा खेळती ठेवण्यासाठी, पावसाचे पाणी मुरवण्यासाठी लोखंडी धारदार पास जोडला आहे. चालवण्यासाठी हँडल आहे. खालच्या बाजूला स्क्रू असून पिकाच्या दोन तासांतील अंतराप्रमाणे पास कमी-जास्त करता येतो. व्हील चेअरसारखे कोळप्याला सहज ढकलता येते.

येथे मिळेल सायकल कोळपे : कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित, औरंगाबाद
कोळपे फायदेशीर
महिलांना १५० रुपये व पुरुषांना ३०० रुपये मजुरी आहे. बैलजोडीने आंतरमशागतीचा खर्च एकरी ५०० ते ६०० रुपये आहे. यापेक्षा सायकल कोळपे फायदेशीर ठरते. पण गवत जास्त झाले तर ते चालत नाही. तेव्हा कमी गवतात याचा वापर करून वेळ, श्रम आणि पैशांची बचत करणे शक्य आहे. श्रीमंत हाके, आडगाव बुद्रूक, ता.औरंगाबाद.