आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी सरकारी हालचाली? जिल्हा बँकांनी एक लाखापर्यंत थकबाकीदारांची यादी मागवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यानंतर महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढत आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील एक लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. तशा आशयाचे पत्रही राज्यातील जिल्हा सहकारी बँकांना मिळाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे ३० हजार कोटींची थकबाकी आहे. यातील ७५% म्हणजे २० ते २१ हजार कोटींची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे केवळ १ हजार ते २ हजार कोटींची, तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे १५ टक्के थकबाकी आहे. कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला होणार असल्याने सरकार योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
वालवड (जि. उस्मानाबाद) येथील अजिनाथ पाडुळे यांनी जाळून घेऊन तर कुरुंदा (जि. हिंगोली) येथील नागोराव दळवी  व मुरूमच्या (जि. उस्मानाबाद) हणमंत मुदकन्ना यांनी विष घेऊन आत्महत्या केली.

राज्य सहकारी बँकेने जिल्हा बँकांना पत्र पाठवून मागवला थकबाकीदारांचा तपशील
राज्य सहकारी बँकेने सर्व जिल्हा सहकारी बँकांकडून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्हा बँकांनी विशेष वसुली अधिकारी तसेच बँक निरीक्षकांना ७ एप्रिल रोजी पत्र पाठवून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे.

एक लाख रुपयांपर्यंतचे थकबाकीदार लाभार्थी?
जिल्हा बँकांनी पाठवलेल्या पत्रानुसार, ३१ मार्च २०१७ अखेर व्याजासह एक लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकबाकीदारांची माहिती द्यायची आहे. समजा व्याजासह बाकी एक लाख एक रुपये होत असेल तर असे शेतकरी पात्र ठरत नसल्याचे पत्रात उदाहरण देऊन नमूद केले आहे.

राज्यातील शेती कर्जाची थकबाकी
>पश्चिम महाराष्ट्र २०-२१ हजार कोटी
राज्यात ३१ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २० ते २१ हजार कोटी रुपये प. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे , नगर या जिल्ह्यांत असल्याचे सांगितले जात आहे. एकूण थकबाकीच्या तुलनेत सुमारे ७५% थकबाकी असल्याचे दिसते.

>विदर्भ-मराठवाडा २००० कोटी 
नाशिक, जळगाव, लातूर, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांत मिळून पाच ते सात हजार कोटी रुपये थकबाकी अाहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे केवळ एक ते दोन हजार कोटींचे कर्ज थकले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऊसपट्ट्यात सर्वाधिक थकबाकी
ऊसपट्ट्यातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत कर्ज थकबाकी जास्त असल्याचे आकडेवारी सांगते. यंदाच्या खरीप तसेच रब्बी  हंगामात सोलापूर जिल्ह्यात सुमारे ५२३ कोटी रुपये, कोल्हापूर ९०० कोटी रुपये थकबाकी अाहे.

१४ तारखेला घोषणा?
उत्तर प्रदेशात देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र माेदी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १४ एप्रिल राेजी पंतप्रधानांच्या नागपूर दाैऱ्यात माफीची घाेषणा होईल. मात्र आता कर्जमाफीची घोषणा केल्यास विरोधी पक्षाला त्याचे श्रेय जाईल असे राज्यातील भाजपच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे ही घोषणा लांबणीवर पडण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्र शेती कर्ज २०१६-१७
- एकूण कर्ज वाटप ४०,५५० कोटी रुपये
- जिल्हा बँकेकडून१५,७६० कोटी रुपये 
- इतर बँकांकडून २४,७९० कोटी रुपये 
बातम्या आणखी आहेत...