आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईबाहेर प्रथमच मराठवाड्यात हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण! शिक्षकाचे हृदय शेतकऱ्याला बसवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण बुधवारी औरंगाबादेतील युनायटेड सिग्मा रुग्णालयात यशस्वी झाले. अपघातात ब्रेनडेड झालेल्या एका शिक्षकाचे हृदय सकाळी ११ वाजता खानापूर (जि. अहमदनगर) येथील शेतकऱ्याला मिळाले. शिवाय बजाज, माणिक रुग्णालयातील रुग्णांना किडनी, तर पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयातील रुग्णास यकृत देण्यात आले.
  
दाता आणि रुग्ण एकाच रुग्णालयात असल्याने वेळ वाचला. हे प्रत्यारोपण पूर्ण मोफत झाले. मुंबईव्यतिरिक्त असे प्रत्यारोपण करणारे सिग्मा हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
 
औरंगाबादेतील जटवाडा येथील रहिवासी, कायगाव येथील साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयातील गणिताचे शिक्षक अनिल पाटील (४६) यांचा २९ जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजता हडकोतील राष्ट्रवादी भवन परिसरात अपघात झाला होता. त्यांना युनायटेड सिग्मा रुग्णालयात दाखल केले  होते. ३१ रोजी सकाळी १० च्या सुमारास ते ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अवयवदानाची तयारी दाखवली होती. त्यानुसार सिग्मा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला (त्यांचे नाव दिव्य मराठीकडे आहे.
 
पण केवळ सामाजिक दायित्व म्हणून ते प्रसिद्ध करणे टाळले आहे.) हृदय देण्यात आले. २०१२ मध्ये त्यांच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयात शस्त्रक्रियाही झाली होती; परंतु वर्षभरापासून  त्यांना दहा पावले चालणे कठीण जात होते. दोन मुले, दोन मुली आणि पत्नी  असा परिवार असलेल्या या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट अाहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने हृदय प्रत्यारोपणाचा विचारही केला नव्हता. मात्र, ‘सिग्मा’ने त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. गेल्या आठवड्यात  वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयातील एकाकडून हृदयदानाबद्दल चर्चाही झाली. मात्र, वेळेचे गणित न जमल्याने ती संधी हुकली होती. पाटील कुटुंबाने हृदयदानाची तयारी दाखवल्यावर वेगात हालचाली झाल्या आणि युनायटेड सिग्मा रुग्णालय तसेच मुंबई येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आठ तासांत शस्त्रक्रिया यशस्वी केली. आणखी दहा दिवसांनी शेतकऱ्याला घरी जाऊ दिले जाईल.

हेल्मेट घातले नसल्यामुळे जिवावर बेतले 
अवयव दान करणाऱ्या पाटील यांना सुनील (रा. मयूरनगर), रत्ना ही भावंडे आहेत. ते सर्वात मोठे बंधू होते.  त्यांच्या पत्नी ज्योती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला असून त्यांना  प्राजक्ता (१९), भाग्यश्री (११) आणि गतिक (६) अशी तीन मुले आहेत. मामीला भावाकडे सोडण्यासाठी दुचाकीवर जात असताना रविवारी सायंकाळी त्यांना एका दुचाकीस्वार तरुणाने उडवले होते. पाटील यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्या तरुणाच्या दुचाकीने जोरदार धडक देताच पाटील खाली पडले. त्यांच्या कानातून रक्तही पडले होते. त्यांच्या मामी किरकोळ जखमी झाल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...