आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर कप स्पर्धेसाठी 2500 नागरिकांचे महाश्रमदान, सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकरांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - सिनेअभिनेता अामिर खान यांच्या पाणी फाउंडेशनमार्फत फुलंब्री तालुक्यात सुरू असलेल्या  “सत्यमेव जयते वाॅटर कप” स्पर्धेमध्ये (दि.१ मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या उपस्थितीत  महाश्रमदानाचे आयोजन आदर्शगाव किनगाव येथे करण्यात आले होते. या श्रमदानात तब्बल अडीच  हजार तरुण-तरुणी, महिला- पुरुष यांनी श्रमदान करून आपला  सहभाग नोंदवला.  
 
तालुक्यातील आदर्शगाव किनगाव येथे पाणी फाउंडेशनमार्फत सुरू असलेल्या  सुळक्या डोंगराच्या पायथ्याशी १ मे या महाराष्ट्र व कामगारदिनी महाश्रमदानाचे आयोजन  करण्यात आले होते. तहसीलदार संगीता चव्हाण, पाणी फाउंडेशनच्या  तालुका समन्वयक ज्योती सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण व  सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी स्वतंत्र बैठक घेऊन महाराष्ट्रदिनी होणाऱ्या महाश्रमदान शिबिराची रूपरेखा ठरवली होती . महाश्रमदानासाठी सकाळी सहा वाजेपासूनच  भरघोस  असा प्रतिसाद मिळत गेला. परजिल्ह्यासह   औरंगाबाद शहर व  परिसरातील नागरिक जो-तो  आदर्श किनगावच्या  रस्त्याकडे धावताना दिसून येत होता. जणू काही या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते गेले. जसजशी श्रमदानाची वेळ संपत जात होती तसतशी आणखी गर्दी या ठिकाणी होत गेल्याने  प्रत्येक नागरिकाच्या हातात टिकास, फावडे आणि घमेले दिसून येत होते. शहरातील  सुशिक्षितांने मोठ्या आवडीने श्रमदान करून आगळावेगळा आनंद लुटत राष्ट्रीय कामात योगदान दिले. श्रमदानासाठी जवळपास ३५०० ते ४०० मीटर सिसिटीची आखणी करण्यात आली होती.  किनगाव फाट्यापासून त्याचप्रमाणे  गणोरी फाटा ते  श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत रस्त्यावर दिशादर्शक बॅनर लावण्यात आले होते. ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्त करण्यात आली होती.  
 
यामध्ये   स्वागत समिती, रजिस्ट्रेशन, काम व्यवस्थापन समिती, आरोग्य समिती, समन्वय समिती, मंडप व्यवस्था, पाणी व्यवस्थापन इत्यादी समित्यांची स्थापना करण्यात आली होती.
 
सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकरांची उपस्थिती  
महाश्रमदानासाठी  सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी हजेरी लावली.  तालुक्यातील चिचोंली बु. या ठिकाणीही सुरू असलेल्या श्रमदानास प्रतीक्षा लोणकर यांनी  हजेरी  लावली. या वेळी श्रमदान करणाऱ्या तरुण-तरुणींनी सेल्फी काढण्याची हौस पुरी करत श्रमदान करून आनंद द्विगुणित केला. तहसीलदार संगीता चव्हाण, जि. प. सदस्या अनुराधा चव्हाण, अतुल चव्हाण, कल्याण चव्हाण, गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर अादींची उपस्थिती होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...