औरंगाबाद - एकेकाळी शिवसैनिक म्हणून कारकीर्द गाजवलेले, परंतु आता विविध पक्षांत विखुरलेल्या शिवसैनिकांनी एकत्र येण्याचे ठरवले असून माजी जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक अराजकीय संघटना स्थापन करण्याचे ठरवले आहे. संघटनेचे नाव आणि १२ जणांच्या मंडळाची लवकरच घोषणा केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. भानुदासराव चव्हाण सभागृहात माजी शिवसैनिकांनी केलेल्या भाषणात सर्वांचाच रोष हा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर होता.
या बैठकीला माजी महापौर सुदाम सोनवणे, रमेश सुपेकर, सदानंद शेळके, माजी आमदार कैलास पाटील, वसंत बावस्कर, माजी सभापती अविनाश कुमावत, बाळासाहेब पवार, सुभाष परदेशी, नगरसेवक भरत लकडे, गंगापूरचे शंकर गुजर, माजी जि. प. सदस्य मच्छिंद्र हाडे, जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले सरपंच राजू कुलकर्णी (बिडकीन) यांच्यासह दीडशेवर शिवसैनिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना सुभाष पाटील म्हणाले, ही संघटना पूर्णत: पक्षविरहित असणार आहे. १९८५ ते ९० च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही भ्रष्टाचार प्रस्थापितांच्या विरोधात लढलो. बाळासाहेबांनी तसे आदेशच आम्हाला दिलेले होते. तेव्हा शिवसेनेला प्रस्थापित नको होते. परंतु तेव्हा शिवसेना ज्याच्याविरोधात लढली आता नेमके तेच शिवसेनेत चालत आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांचे सैनिक आहोत. गप्प बसून कसे चालेल? त्यामुळे आम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हे संघटन पक्ष किंवा अन्य कोणत्याही वादापासून दूर असेल. जुन्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन जुन्याच पद्धतीने लढा द्यायचा, असे आम्ही ठरवले आहे. येत्या काही दिवसांत संघटनेचे नाव ठरेल आणि बोर्डावरील २१ जणांची नावेही जाहीर केली जातील. शहराचे वाटोळे कसे झाले, जिल्हा परिषदेत काय चालले आहे, कोणी पैसे कमावले, कोण प्रस्थापित झाले, कोण भ्रष्टाचारी आहे, याविरोधात हे आंदोलन चालेल.
खैरेंना फटका
स्वत:पाटील यांनी खैरे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, येथे झालेल्या भाषणात जवळपास सर्वांनीच खैरे यांच्याविरोधात राग व्यक्त केला. येथील शिवसेनेची वाताहत केवळ खैरे यांच्यामुळेच झाल्याचा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे अर्थातच या अराजकीय संघटनेचा फटका खैरे यांना बसू शकतो, असा कयास आहे.