आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राची पुरोगामी पावले, पैठणला पर्वणीमुळे मुस्लिम बांधवांनी पुढे ढकलली कुर्बानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीचे शाही स्नान आणि मुस्लिम बांधवांची पवित्र ईद शुक्रवारी एकाच दिवशी होती. परंतु सलोख्याचे अनोखे दर्शन घडवत मुस्लिमांनी बोकड्याची कुर्बानी देणे एक दिवस पुढे ढकलले. आता शनिवारी येथे बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. संत एकनाथांच्या नगरीतील हा पैठण पॅटर्न कौतुकाचा विषय ठरला आहे.
शाही स्नानामुळे कुर्बानी दिली जाणार नाही, असा निर्णय मुस्लिम बांधवांनी शांतता कमिटीच्या बैठकीत घेतला. मुस्लिम बांधवांचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी म्हटले आहे. बकरी ईद एक दिवस पुढे साजरी करण्यामुळे बंधुतेचा संदेश दिला आहे, असे अजिम कट्यारे म्हणाले.
पावित्र्य राखले पाहिजे
हिंदूंचा कुंभमेळा १२ वर्षांनी येतो. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. हा विचार करून शुक्रवारची बकरी ईदची कुर्बानी एक दिवस पुढे करू, असे मुस्लिम समाजाचे काझी अताहल्ला यांनी जाहीर केले.

पुण्यात मानाच्या पाच श्रींचे यंदा हौदात विसर्जन होणार
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळांनी यंदा महापालिकेच्या हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय झाला आहे.

कसबा गणपती पुण्यातील मानाचा पहिला आहे. नंतर तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ व केसरीवाडा ट्रस्ट मंडळ यांच्या गणपतींचा क्रमांक लागतो. मानाच्या या मंडळांनी कसबा गणपती मंडपात बैठक घेतली. सायंकाळी पत्रपरिषदेत हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, वाहत्या पाण्यात विसर्जनच धर्मशास्त्रसंमत असल्याचे म्हणत सनातनच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयास विरोध दर्शवला.
असे विसर्जन कळवा
घरच्या ‘श्रीं’चेही घरातच एखाद्या पात्रात विसर्जन करा आणि नाव, पत्ता दै. "दिव्य मराठी'कडे एसएमएसद्वारे ९८८१३००८२१ या क्रमांकावर पाठवा. गणेश मंडळांनीही असे हौदात विसर्जन केल्यास कळवावे.