आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचे नाटक करून महिलेशी लग्न, 15 दिवसांत दागिने, पैसे घेऊन तरुण फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहावर्षे मोठ्या असणाऱ्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. पंधरा दिवस सोबत राहिल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम घेऊन तरुण फरार झाला. सलामपुरे वडगाव येथे हा प्रकार घडला. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात महिनाभरापूर्वी तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र तुमचा नवरा आहे, तुम्हीच त्याला शोधून आणा, असे उत्तर या महिलेला पोलिसांकडून मिळाले. अखेर तिने सोमवारी पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला. 
 
पंधरा वर्षांपूर्वी सरलाचा (नाव बदलले आहे) विवाह झाला होता. मात्र दोनच महिन्यांत हा विवाह मोडला. त्यानंतर तिने आई-वडिलांचे घर सोडून वाळूज गाठत कारखान्यात नोकरी सुरू केली. वर्षभरापूर्वी याच भागात कारखान्यात नोकरी करणाऱ्या सागर डोंगरदिवे (३१) याच्याशी तिची ओळख झाली. ती एकटी राहत असल्याचे समजताच सागरने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. आपण लग्न करू, असे तो म्हणाला. मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. लग्न कसे होणार असे सरलाने विचारले असता अनेक अभिनेत्यांनी वयाने मोठ्या असणाऱ्या अभिनेत्रींसोबत लग्न केले. आपणही तसेच करू, मी तुला जीवनभर साथ देईन, असे तो म्हणाला. त्यावर विश्वास ठेवून २६ जून रोजी घरगुती पद्धतीने विवाह झाला. 
 
१५ ते २० दिवस संसार झाल्यानंतर सागर एक दिवस घरी आला माझे मित्रांसोबत भांडण झाले, त्यात माझा मोबाइल फुटला असे म्हणत त्याने सरलाकडून ४५ हजार रुपये घेतले. त्यानंतर बहिणीच्या लग्नासाठी ३० हजार रुपये रोख आणि दागिने गहाण ठेवून दहा हजार घेतले. जून रोजी चिखलीला बहिणीच्या लग्नाला जाऊन येतो, असे सांगून वाळूज येथून निघून गेला. त्याला फोन केला असता तो उचलत नाही. त्याचा पत्ताही माहीत नाही म्हणून सरलाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्याचा मोबाइल क्रमांक दिला. मात्र तुझा नवरा आहे, तूच त्याला शोधून आण, असे पोलिस मला सांगत असल्याचे तिने पोलिस आयुक्तालयात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...