आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा बेघर निवारागृहात होणार मोफत अभ्यासिका, शासनाकडून दोन कोटी 30 लाख रुपये मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्र निवाऱ्याची पाहणी करताना मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि पदाधिकारी. - Divya Marathi
रात्र निवाऱ्याची पाहणी करताना मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि पदाधिकारी.
औरंगाबाद- मनपाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या बेघर निवारागृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दोन कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शनिवारी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी निवारागृहाची पाहणी केली. तेथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले आढळून आली. त्या वेळी मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध करून त्यांच्यासाठी स्वतंत्र रूमची व्यवस्था करण्याचे आदेश बकोरिया यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 
 
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गत शहरात सहा ठिकाणी बेघर निवारागृहे चालवण्यात येतात. यात १५६ पेक्षा जास्त बेघरांची तेथे व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारागृहाच्या दुरुस्तीसाठी आणि यात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने दोन कोटी ३८ लाख रुपये मंजूर केले आहेत. निधी खर्च करण्यापूर्वी बकोरिया यांनी स्वत: आज सर्व ठिकाणी पाहणी केली. पाहणी करताना निवारागृहात बाहेरगावाहून आलेले आणि शहरात अन्यत्र राहण्याची व्यवस्था नसल्याने या निवारागृहात थांबून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले काही विद्यार्थी दिसून आले. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी निवारागृहात अभ्यासिका सुरू करण्याची सूचना बकोरिया यांनी केली. रात्र निवारागृहांचे स्वरूप बदलून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात बेघर निवारागृहे असे करण्यात आले आहे. 
 
निवारागृहे २४ तास सुरू राहतात. निवारागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तेथील साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यात पाच केंद्रांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ९० लाख, तर विविध संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या निवारागृहांसाठी ४८ लाख अशी दोन कोटी ३८ लाख रुपयांची मागणी केली होती. शासनाने हा निधी मंजूर केला असून काही दिवसांत ही रक्कम मनपाला मिळणार आहे. 
 
 
 
मोतीकारंजातील निवारागृह महिलांसाठीच 
चिकलठाणा, सिडको एन -६, गांधीनगर मोतीकारंजा येथील निवारागृहांना त्यांनी भेट दिली. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून निवारागृहांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा येथे फक्त महिलांसाठी निवारागृह असून मोतीकारंजा येथील महिला पुरुषांचे निवारागृह फक्त महिलांसाठी करण्याची सूचना बकोरिया यांनी केली. या वेळी कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दिकी, एनयूएलएमचे प्रमुख उदय जराड, सचिन बैनाडे यांची उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...