आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM Special : पैठणमध्ये अर्ध्या तासात ­फळबागांसह 185 घरांची पडझड; पंचनामे सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोनशे वीज खांब पडले - Divya Marathi
दोनशे वीज खांब पडले
पैठण - तालुक्यातील पाचोडसह थेरगाव परिसरात शनिवारी वादळी वाऱ्याने घातलेल्या थैमानामध्ये अनेक फळबागांसह शंभराहून अधिक घरांची पडझड झाली असून जवळपास २० कोटींवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज थेरगावचे सरपंच बद्री निर्मळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.  

शनिवारी सहा वाजेच्या सुमारास वादळामध्ये शंभराहून अधिक घरांवरील पत्रे उडाले असून डाळिंब, पपई, मोसंबी, केळी आदी फळबागांचे नुकसान झाले. सध्या पेरणीचे दिवस असल्याने रासायनिक खते, बियाणे घरांमध्ये आणून ठेवले होते. मात्र, या वादळात घरांवरील पत्रे उडाल्याने खते, बियाण्यांसह घरगुती साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यास रविवारी सुरुवात झाली अाहे. त्यामुळे आता उद्ध्वस्त झालेल्या थेरगावला केवळ पंचनाम्याचा आधार असून तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी थेरगावसह परिसरातील लोकांकडून होत आहे.  दरम्यान, माजी आमदार संजय वाघचौरे, रवींद्र काळे यांनी रविवारी थेरगाव येथे जाऊन नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देत तातडीने पंचनामे आटोपून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. वादळामध्ये परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडली असून शंभरहून अधिक शेळ्या, चाळीस बैल जखमी झाले. जखमी शेळ्या व बैलांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे पंचनाम्यादरम्यान मंडळ अधिकारी व एका तलाठ्यामार्फत सांगण्यात आले.
 
अख्खी रात्र जागून : थेरगाव येथे वादळामध्ये घरांवरील पत्रे उडाल्याने शंभराहून अधिक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला. त्यामुळे या नुकसानग्रस्तांनी समाजमंदिरामध्ये आश्रय घेऊन संपूर्ण रात्र जागून काढली.  महावितरण कंपनीचे २५ खांब आणि २ रोहित्रांचे पूर्णतः नुकसान झाले असून यात सुमारे ७ लाखांवर नुकसान झाले.