आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' नोटिसीमागे काँग्रेसचे मनसबदार?, गांधी बवनाचे नव्याने बांधकाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेसचे शहर जिल्हा मुख्यालय असलेल्या शहागंजातील गांधी भवनाच्या ४० वर्षे जुन्या इमारतीला पालिकेने धोकादायक ठरवून बुधवारी नोटीस जारी केली. ही इमारत अजून मजबूत असतानाही पालिकेकडून नोटीस गेलीच कशी, या प्रश्नाचे उत्तर शोधले असता यामागे काँग्रेसचेच काही आजी-माजी पदाधिकारी असल्याचे समजते. खासगीत बोलताना काही पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला; परंतु पक्षातर्फे इमारत पाडली गेली तर त्यास विरोध होणार हे गृहीत धरून पालिकेला हाताशी धरण्यात आल्याचे समोर आले आहे. या इमारतीच्या निर्माणाच्या साक्षीदारांनी ती पाडण्यास विरोध केला आहे.

कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असतानाही या इमारतीतून काँग्रेसला सध्या एक पैसाही मिळत नाही. ही इमारत पाडून नव्याने बांधकाम केल्यास मासिक उत्पन्न सुरू होईल आणि त्यातून कार्यालयीन खर्च भागेल, असे गणित त्यामागे असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात सुमारे साडेसात हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या भूखंडावर २० ते २५ गाळे सहज उभारले जाऊ शकतील. काही गाळ्यांचा ताब्या आपल्याकडे येऊ शकतो. त्यामुळेच एका गटाने हा प्रयत्न चालवला अाहे. यापूर्वीच गांधी भवन शहराबाहेर असावे, यासाठी प्रयत्न सुरू झाला होता.

४० वर्षांपूर्वी दुकाने भाड्याने देण्यात आली तेव्हा काहींना १० रुपये, १२ रुपये, तर कमाल भाडे १५ रुपये होते. कालौघात भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही. आजही तेवढेच भाडे आहेत आणि जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या म्हणण्यानुसार ते भाडे मिळत नाही.

पोट भाडेकरूंचाच गाळ्यांवर ताबा
सध्यामूळ भाडेकरू येथे दिसतच नाहीत. त्यांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून काही हजारांत दरमहा भाडे वसूल केले जात असल्याचे समजते. काही पोटभाडेकरूंनी तर थेट ताबा घेतल्याचीही चर्चा आहे. इमारत पाडल्यास मूळ भाडेकरूंनाच काही सवलती तसेच नव्या बांधकामात वाटा मिळू शकेल.
ट्रस्टी हयात नाहीत
पक्षाचेकार्यालय उभारण्यासाठी गांधी भवन ट्रस्ट स्थापन करण्यात आले होते. त्यात बाबूराव काळे, हिरूभाऊ जगताप, विनायकराव पाटील आदी मंडळी ट्रस्टी होती. जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष या दोन पदांवरील व्यक्तींना पदसिद्ध सदस्य करण्यात आले होते. यातील बहुतांश ट्रस्टी आता हयात नसल्याचे ज्येष्ठ नेते या गांधी भवनाचे प्रारंभीपासूनचे साक्षीदार प्रकाश मुगदिया यांनी सांगितले.

पक्ष कार्यासाठी पुरेशी जागा
> इमारत पाडून बांधण्याची मागणी कोणी केली तरी तसे आम्ही होऊ देणार नाही. पक्षाच्या कार्यासाठी आहे तेवढी जागा पुरेशी आहे. राहिला प्रश्न कोणी प्रयत्न केला तरी तातडीने तसे करता येणार नाही. ट्रस्टी आज हयात नाहीत. त्यांच्या जागेवर अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागेल. परंतु तसे होऊ दिले जाणार नाही.
-प्रकाश मुगदिया, ज्येष्ठनेते तथा गांधी भवन निर्माणाचे साक्षीदार.

इमारत पाडू देणार नाही
>पक्ष कार्यालय अन्यत्र हलवावे यासाठी यापूर्वीच काही जणांकडून प्रयत्न झाले होते, हे खरे आहे. येथील गाळ्यांना अल्प भाडे आहे तेही वसूल होत नाही हेही खरे आहे; परंतु या गांधी भवनाशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही ही इमारत पाडू देणार नाही. काही तरुण कार्यकर्त्यांना तसे वाटत असले तरी आम्ही ते होऊ देणार नाही.
केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष तथा पदसिद्ध ट्रस्टी
बातम्या आणखी आहेत...