आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या गांधी भवनाचा वाद अखेर पोलिसांत पोहोचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहागंजयेथील गांधी भवनाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याचे प्रयत्न काही काँग्रेसजनांकडून सुरू असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर गाळेधारक विरुद्ध गांधी भवनाचे ट्रस्टी यांच्यातील वाद गुरुवारी समोर आला. गाळेधारकांनी भाडे दिले नाही, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे, तर गाळा ताब्यात ठेवण्यासाठी लाखांची खंडणी मागितल्याचे एका गाळेधारकाने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी घेतल्या असून गुन्ह्याची नोंद मात्र केलेली नाही.

गांधी भवनचे ट्रस्टी तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे त्यांच्या साथीदारांनी सकाळी दुकानात घुसून सहा लाखांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने औताडेंसह तिघांनी पत्नीसमक्ष बेदम मारहाण केल्याची तक्रार गाळे क्रमांक एकचे ताबेदार गणेश नंदकिशोर गुप्ता यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात दिली. तत्पूर्वी औताडे यांनी पोलिसांत तक्रार देऊन गुप्ता यांनी गाळा बळकावला असून भाडेही दिले नाही. पालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी पैसे लागणार म्हणून त्यांच्याकडे भाडे मागण्यासाठी गेलो असता त्यांनीच उद्धटपणे उत्तरे देऊन वर्षभराचे भाडे देण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. दोघांनीही सिडको पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिल्याने येत्या काळात येथील अन्य गाळ्यांचा वादही समोर येण्याची शक्यता आहे.

कल्पना नाही : पालोदकर
स्व.माणिकराव पालोदकर यांचा गाळा मी घेतला आहे, असा दावा गुप्ता यांनी केला आहे. मात्र, स्व. माणिकरावदादा पालोदकर यांनी गांधी भवनात गाळा घेतला होता याची मला माहिती नाही. मला आत्ता हे कळले आहे, असे त्यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे नेते प्रभाकर पालोदकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. मला या प्रकरणाची काहीही माहिती नाही गाळा कोणाच्या नावाने आहे याचीही माहिती नाही, असेही पोलोदकर यांनी स्पष्ट केले.

२०हजार रु. देतो : गुप्ता
२००२मध्ये मी हा गाळा तत्कालीन काँग्रेस नेते स्व. माणिकराव पालोदकर यांच्याकडून करारावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु त्यांचे निधन झाले. तेव्हापासून गाळा माझ्याकडेच आहे. औताडे त्यांचे सहकारी माझ्याकडून दरमहा २० हजार रुपये घेऊन जातात. सकाळी ते माझ्याकडे आले. सहा लाख दे, अन्यथा गाळा खाली करून घेऊ, अशी धमकी देत त्यांचा ड्रायव्हर, अग्रवाल नामक एक व्यक्ती अशा तिघांनी मला माझ्या पत्नीसमोर बेदम मारहाण केली.

तो गाळा नेमका कोणाचा?
हागाळा स्व. पालोदकर यांच्याकडून घेतल्याचा दावा गुप्ता यांनी केला, तर हा गाळा गांधी भवन ट्रस्टने सिल्कमिलला दिला होता. त्यांचे येथे शोरूम होते, असे औताडे यांनी स्पष्ट केले. त्याची कागदपत्रे देण्यास दोघांनी तूर्तास नकार दिल्याने हा गाळा करारावर नेमका कोणी घेतला हे समोर येऊ शकले नाही.

मालमत्ता कर थकल्याने पालिकेने गांधी भवनाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाडे थकवलेल्या गाळेधारकांशी आम्ही गेल्या चार दिवसांपासून बोलणी करत आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी भाडेवसुली करण्याचे ठरले आहे. आम्ही सकाळी गाळे क्रमांक-१ येथे गेलो. तो गाळा सिल्कमिलला भाड्याने देण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुप्ता नावाच्या युवकाने तो बळकावला. त्याच्याकडे विचारणा केली असता मुलीला कर्करोग झाला आहे, मदत करा, असे तो म्हणाला. त्यामुळे रीतसर करार करून घे अन् गेल्या वर्षभराचे भाडे भर, असे मी त्याला सांगितले. त्याने चक्क नकार दिला. गाळा माझा आहे, तुमचा संबंध नाही, असे तो म्हणाला. गाळा तर गांधी भवन ट्रस्टचा आहे. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने मी पोलिसांत तक्रार दिली. मी गुप्ताला मारहाण केल्याची तक्रार खोटी आहे.