आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदमाश पोलिसांच्या यादीत थापाचा क्रमांक पहिला, 25वर्षांपूर्वी माया डोळसला पळवून लावल्याचा होता आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिस खात्यातील एक जमादार गेल्या चार दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारण्यांपासून ते गुन्हेगारी जगतापर्यंत जमादार वीरबहादूर गुरुंग ऊर्फ थापा याचे किस्से चर्चिले जात आहेत. ज्या वेळी त्याला न्यायालयासमोर हजर केले तेव्हादेखील अनेक लोक त्याला पाहायला आले होते. बदमाश पोलिसांच्या यादीतदेखील त्याचा पहिला क्रमांक लागतो. हे खुद्द पोलिस आयुक्तांनाही मान्य करावे लागले.
 
 कायद्याच्या रक्षणासाठी असलेला पोलिसच भक्षक का होतो, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र कायदा सर्वांसाठी समान आहे हे शहर पोलिसांनी थापाला अटक करून दाखवून दिले. शहरातील बदमाश पोलिसांची यादी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मागवली असता या यादीत थापाचा पहिला क्रमांक होता. त्यानुसार त्याची चौकशी करून कारवाईही करण्यात आली होती.

 परिमंडळ दोनमधून त्याची बदली मुख्यालयात करण्यात आली. त्यानंतरही शहरातील गुन्हेगारी जगतातील त्याचे संबंध कायम होते. त्यामुळेच २६ फेब्रुवारी रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात जुन्या चलनातील एक कोटी रुपये चोरी झाल्याची तक्रार व्यापाऱ्याने नोंदवली. त्यात कुख्यात गुंड सलीम स्टेफनीचे नाव समोर आले आणि त्याच्या चौकशीतून थापाची पोलखोल झाली. 

पोलिस खात्यात राहूनही थापा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कसा वळला, हा प्रश्न मात्र अनेकांना पडला आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या नोकरीत थापाने पोलिस ठाण्यातील डीबी पथक, गुन्हे शाखा आणि स्पेशल स्कॉर्डमध्ये काम केले. त्यामुळे त्याचा गुन्हेगारांशी जवळून संबंध आला. यातील अनेक गुन्हेगार हे त्याचे खबरे म्हणून काम करू लागले. 
 
पोलिस खात्यासाठी ही गोष्ट नवी नाही. प्रत्येक तपासी अधिकाऱ्याचे असे खबऱ्यांचे नेटवर्क असते. मात्र थापाने या गुन्हेगारांशी खबऱ्यांच्या पुढे जाऊन दोस्ती केली आणि तेव्हापासूनच तो या जगताकडे ओढला गेला. विशेष म्हणजे कायम डीबी, क्राइम आणि स्पेशल स्कॉर्डमध्ये नोकरी केल्यामुळे थापा अधिकाऱ्यांच्या जवळचा होता. त्याचे खबऱ्यांचे नेटवर्क चांगले असल्यामुळे त्याने अनेक गुन्हे उघडकीस आणलेसुद्धा. 

मात्र हे नेटवर्क पोलिस खात्यासाठी वापरता त्याने स्वत:साठी वापरणे सुरू झाले. तसा हव्यासदेखील वाढत गेला. यातूनच थापाला ‘कलेक्टर’ अशीही पदवी मिळाली. थापाची बदली मुख्यालयात असो की पोलिस ठाण्यात त्याचे शहरातील सिडकोसह इतर विभागाशी असलेले संबंध कायम राहिले. 

मुंबईहून आल्यानंतर थापा बदलला : १९९२मध्ये म्हणजे तब्बल २५ वर्षांपूर्वी मुंबईतील गँगस्टर माया डोळस याला पळवून लावल्याचा आरोपही थापावर झाला होता. हर्सूल कारागृहात मायाला ठेवण्यात आले होते. मुंबईच्या तारखेसाठी त्याला हजर करायचे होते. त्याला घेऊन जाण्याची जबाबदारी थापा इतर सहकाऱ्यांकडे दिली होती.
 
मुंबई येथील कोर्टाच्या परिसरातून माया पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. त्या वेळी मुंबई पोलिसांनी थापा इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्या वेळी थापा आणि सहकाऱ्यांची गुन्हेगारासारखी चौकशी झाली. 
 
चौकशीत दुसऱ्या मोरे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले. इतरांचा यात काहीही समावेश नाही, असे सांगितले. दरम्यान, माया डोळसचा एन्काउंटरमध्ये मृत्यूही झाला. त्यानंतर थापा निर्दोष असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर तो खात्यात पुन्हा रुजू झाला. 

अनेक वेळा संधी देऊनही सुधारला नाही : मुंबईच्या प्रकारानंतरही थापाच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत येतच होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ते जाणीवपूर्वक केले गेले की कामाच्या व्यापात झाले याबाबत मात्र कोणी बोलायला तयार नाही.
 
 दोन वर्षांपूर्वी परिमंडळ दोनच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या विशेष पथकातही थापाचा समावेश होता. यातही तक्रार आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्याची बदली पोलिस आयुक्तालयात केली. त्यानंतरही त्याचे काही खास सहकाऱ्यांच्या साहाय्याने जुन्या हद्दीतील संबंध कायम होते. 
 
सध्याचे प्रकरण : सेंट्रलनाका परिसरात २१ फेब्रुवारी रोजी रात्री चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या एक कोटी रुपयांच्या नोटा लुटण्यात आल्या. या प्रकरणी शेख फजल शेख युसूफ, जमीर खान जलील खान, शेख शहजाद ऊर्फ सद्दाम शेख रियान आणि साजिद अब्दुल ऊर्फ अंकल कय्युम यांना अटक करण्यात आली होती. नारेगावातील माफिया सलीम स्टेफनीचादेखील यात समावेश असून चोरीला गेलेले ९४ लाख थापा आणि सलीम स्टेफनी यांच्याकडून जप्त करण्यात आले.

 याप्रकरणी राजेश हरगोविंदजी ठक्कर (५५, रा. एन-१ सिडको) यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिवळ्या रंगाच्या शर्टमधील थापाला बारा ते पंधरा पोलिसांच्या बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
 
गुन्हेगारीत ओढला गेला 
-पोलिस खात्यात असतानाही गुन्हेगारी जगताकडे तो ओढला गेला. याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्याच्याकडे असलेल्या खबऱ्यांच्या जाळ्याचा त्याने खात्यासाठी उपयोग करता स्वत:साठी उपयोग केला असावा. त्याचेच हे परिणाम आहेत. खुशालचंद बाहेती, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त. 
 
पोलिस बॉय ते गुन्हेगार 
वीरबहादूर हा पोलिसाचा मुलगा आहे. जालन्यातील एसआरपीएफमध्ये त्याचे वडील तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. त्यामुळे लहानपणापासून त्याने पोलिस खाते जवळून पाहिले आहे. १९८९ मध्ये तो पोलिसांत शिपाई म्हणून भरती झाला. 
 
उंची कमी असतानाही पोलिसांच्या मुलाला शासनाने दिलेल्या सवलतीनुसार त्याला सूट मिळाली. वयाची पंचेचाळिशी गाठली तरी तो फिट आहे. तो बॉक्सिंग तसेच रोज जिममध्ये व्यायाम करतो.
 
गुन्ह्यांचे डिटेक्शन करण्यात मात्र त्याचा हातखंडा असल्याचेही कर्मचारी सांगतात. चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी थापासोबत काम केले आहे. खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते पुढे अधिकारी झाले. 
बातम्या आणखी आहेत...