आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीच्या सहा सुरक्षा रक्षकांनी दमदाटीमुळे सोडली नोकरी, कर्मचारीच घालतात हुज्‍जत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चार महिन्यांपूर्वी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकांपैकी सहा जणांनी नोकरी सोडली आहे. घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्यांनी हे पाऊल उललल्याची बाब समोर आली आहे. 
 
रुग्णांचे नातलग आणि डॉक्टर यांच्यात होणारा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने मेस्कोला हटवून या सुरक्षा रक्षकांना पाचारण केले होते. मात्र, वेळी-अवेळी वॉर्डात प्रवेश मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातलगांऐवजी घाटीतील कर्मचारीच अधिक हुज्जत घालतात, अरेरावी, दमदाटी करतात. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी नोकरी सोडल्याचे पुढे आले आहे. 
 
बैठकीत समोर आली बाब : चारमहिन्यांपासून ५३ सुरक्षारक्षक घाटीत कार्यरत आहेत. त्यांच्यासह पूर्वीच्या मेस्को संस्थेचेही ३० रक्षक विविध विभागांत सेवा देतात. या रक्षकांनी ठरावीक वेळेत नातलगांना भेटीसाठी सोडणे, आपत्कालीन स्थितीत डॉक्टरांना संरक्षण देणे हे काम करणे अपेक्षित आहे. घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी या रक्षकांना दम देत हे लोक माझ्यासोबत आहेत, म्हणत ते १० जणांना आत घेऊन जातात. यामुळे भेटीची वेळ नसतानाही वॉर्डांत नातलगांची गर्दी होते. यातून गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असे नुकत्याच झालेल्या घाटीच्या बैठकीत समोर आले. 

या बैठकीला सुरक्षा रक्षकांचे प्रमुख सत्यनारायण जयस्वाल, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी उपस्थित होते. ही समस्या सोडवू, असे आश्वासन देतानाच डॉ. येळीकर यांनी सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी सलीम शेख, दिलीप लटपटे, भगवान गायकवाड यांनी समस्या मांडल्या. विशेष अधिकार असलेल्या सुरक्षा रक्षकांनी चार महिन्यांत डॉक्टरांच्या रक्षणाचे काम उत्तमपणे केले. या काळात रक्षकांनी अचूक पद्धतीने परिस्थिती हाताळली, याबद्दल डॉ. येळीकर यांनी सर्वांचे कौतुक केले. याखेरीज नातलगांना जेवणासाठी जागा निश्चित करणे, भेटीच्या वेळा पाळणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 
 
वागणूक योग्य हवी 
महामंडळातील मुलांना हवालदारांचे प्रशिक्षण दिले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी त्यांच्याशी वाद घालतात. सुरक्षेसाठीच ते सजग राहतात. त्यामुळे सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा आहे. 
- सत्यनारायण जयस्वाल, सुरक्षा रक्षकांचे प्रमुख 
 
अशांना वठणीवर आणा 
घाटीरुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची काळजी घेताना तुम्हाला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, आमचेच कर्मचारी हे नियम मोडत असतील, तर त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी तुमची आहे, असा सल्ला अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...