आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा डाॅक्टर असूनही सायंकाळी नंतर घाटीत पोस्टमाॅर्टेम नाही, डॉ.कराड यांनी उपस्थित केला प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तब्बल दीड वर्षानंतर घाटी रुग्णालयात शुक्रवारी अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यात एकच एमडी डाॅक्टर उपलब्ध असल्याने सायंकाळी वाजेनंतर शवविच्छेदन (पोस्टमाॅर्टेम) होऊ शकत नाही, असे विभागप्रमुख डाॅ. के.यू. झिने यांनी सांगितले. प्रत्यक्षात या विभागात दहा डॉक्टर आहेत. मात्र, २००९ मध्ये एकच डॉक्टर असल्याने तत्कालीन अधिष्ठातांच्या संमतीने वाजेनंतर शवविच्छेदन बंद करण्यात आले होते. तोच नियम डॉक्टरांची संख्या वाढूनही कायम ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

घाटीच्या नेत्र विभागात नवनिर्वाचित अभ्यागत समिती सदस्यांची पहिली बैठक झाली. या वेळी समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, डॉ. भागवत कराड, मुकुंद फुलारे, साधना सुरडकर, पत्रकार उमेश काळे, प्रल्हाद पारटकर, राम बुधवंत, डॉ. दिलीप खनाळे, आशा जाधव, तर प्रशासनाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आणि अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांची उपस्थिती होती. डॉ. कराड म्हणाले, घाटी विभागीय केंद्र आहे. सायंकाळी वाजेनंतर येथे शवविच्छेदन केले जात नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागते. पुण्या-मुंबईत रात्रीही शवविच्छेदन केले जाते. मग औरंगाबादेत का नाही? सायंकाळी शवविच्छेदन करू नये असा शासन निर्णय आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर डॉ. झिने यांनी सांगितले की, २००९ पर्यंत घाटीत रात्रीही शवविच्छेदन केले जात होते. मात्र एकच एमडी डॉक्टर चोवीस तास सेवा देऊ शकत नाही म्हणून वाजेनंतर शवविच्छेदन बंद करण्याचा निर्णय अधिष्ठातांच्या संमतीने घेण्यात आला होता.

नियमानुसार सूर्यप्रकाशातच शवविच्छेदन करायला हवे. मात्र, सध्या आम्ही पंचनामा झालेल्या शवांचे किंवा अत्यावश्यक ठिकाणी तत्काळ विच्छेदन करून देतो. आजवर आमच्याविरुद्ध तक्रार आलेली नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

बैठकीनंतर एका वरिष्ठ डाॅक्टराने सांगितले की, शवविच्छेदन विभागामध्ये एमडी, पीजी आणि एक एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे. एक डॉक्टर असल्याने सायंकाळी काम बंद केले होते. काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांची संख्या वाढल्यानंतरही विभागाने काम सुरू केलेले नाही.

पाणी, ड्रेनेज, विजेचा मूलभूत प्रश्न कायम
डॉ.म्हस्के म्हणाले, इमारतींची डागडुजी, पाण्याची उपलब्धता, ड्रेनेजची व्यवस्था तसेच विजेची मूलभूत समस्या आमच्यापुढे आहे. त्या सोडवण्यासाठी मदत मिळावी. तसेच औषधीसाठी कमी निधी येतो याकडेही लक्ष वेधले. यावर आ. शिरसाट यांनी स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशी सूचना केली.

शिक्षण आणि संशोधन आमचे काम
डॉ.जेवळीकर म्हणाले की, ज्ञानदान करणे आणि समाजोपयोगी संशोधन करणे हे आमचे काम आहे. मात्र, आम्हाला पूर्णवेळ रुग्णसेवेत गुंतून पडण्याची वेळ आली आहे. मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि आमच्यावरील ताण कमी करण्यासाठी मनपा तसेच जिल्हा रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...