पैठण - श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे भाविक, वारकऱ्यांत महत्त्व असल्याने या एकादशीनिमित्त बाहेर गावाहून आलेल्या वारकरी भक्तांना तसेच ग्रामस्थांना गोदावरी नदी पात्रात स्वच्छ पाणी नसल्याने दूषित पाण्यातच स्नान करावे लागले. दोन महिन्यांपासून गोदावरी जायकवाडीच्या विद्युत केंद्रातून पाणी येते. मात्र हे केंद्र बंद असल्याने नदी पात्रातील पाणी अतिशय दूषित झाले आहे, याच पाण्यात आज भाविकांना स्नान करावे लागले.
पुत्रदा एकादशी असल्याने कुटुंबजनांना फराळ खाऊ घालून पुण्य पदरात पाडून घेतले. श्रावण मासातील या एकादशीच्या शुभ पर्वावर वारकऱ्यांनी शहरातील बारा महादेवांचे दर्शन घेऊन नाथवाड्यातील विजयी पांडुरंगासह नाथ समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी लोटली होती. चोखोबा मठात पद्माकर जैन व प्रभाकर महाराज चाबुकस्वार यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम रंगला. ढोलेश्वर मंदिरात बालवयात नाथांना देवगिरीवर जाऊन जनार्दन स्वामींचा आशीर्वाद घेऊन जीवन कल्याणमय करून घे, असा दृष्टांत झाला आणि नाथांचे परमार्थ आणि गृहस्थआश्रमी जीवन प्रबोधनमय घडले.
भाविकांना सहकार्य करण्यासाठी संत एकनाथ महाराज सेवाभावी मंडळ, विश्वस्त मंडळ व पोलीस कर्मचारी मदत करण्यासाठी परिश्रम घेत होते तर माऊली मडके मित्रमंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला.