आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरलेले सोने तो ‘मुथूट’मध्ये ठेवून लाखोंची कर्जे उचलायचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चोरलेले सोने सोनाराकडे विकण्यासाठी गेल्यास आपले बिंग फुटण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे तो घरफोड्यांत लुटलेले सोने मुथूट फायनान्समध्ये खुशालपणे तारण ठेवून त्यावर लाखोंची कर्जे घेऊन तो उजळ माथ्याने फिरायचा. मात्र, एक दिवस तो सोनाराकडे सोने विकण्यासाठी आला आणि तेथेच त्याचे चौर्यकर्म उघड झाले. तो पोलिसांच्या तावडीत सापडला. मूळचा बीड जिल्ह्यातील सावंगी आष्टी येथील या चोरट्याने शहरातील उस्मानपुरा परिसर आपली कर्मभूमीच बनवली होती. मुकेश शंकर सावंत असे या चोरट्याचे नाव.
मुकेश हा शहरातील उस्मानपुरा भागातील उच्चभ्रू वसाहतीत घरफोड्या करत होता. चोरीत लाटलेले सोने तो आष्टी येथील मुथूट फायनान्समध्ये तारण ठेवून त्यावर कर्जे घेत होता. पण यावेळी त्याला शहरातील सोनाराकडे सोने विकावेसे वाटले. तो मंगळवारी शहरात सोने विकण्यासाठी येणार असल्याचे गुप्त बातमीदाराने उस्मानपुरा पोलिसांना कळवले. त्यानुसार उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून मुकेशला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून ५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले अाहे. काही सोने आपण सावंगी अाष्टी येथे मुथूट फायनान्समध्ये ठेवल्याची कबुली त्याने दिली. तसेच उस्मानपुरा आणि उल्कानगरीत दोन घरे फोडल्याचेही त्याने सांगितले. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलिस आयुक्त एम. ए. बाखरे, प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार संतोष सोनवणे, प्रल्हाद ठोंबरे, जनार्दन हरणे, मनोज बनसोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्याला अटक : शहरातचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका संशयिताला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल संजय धोत्रे (१९ रा. औरंगपुरा) असे या संशयिताचे नाव आहे. २७ नोव्हेंबर रोजी औरंगपुऱ्यातील सुलभ शौचालयाजवळ एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातले पैसे काढून घेतल्याची कबुली त्याने दिली. उपनिरीक्षक अनिल वाघ, शेख आरेफ, मनोज चव्हाण, संतोष काकडे, संतोष सूर्यवंशी, मुक्तेश्वर लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या सावंत हा शहरातील उस्मानपुरा भागात चोरी केलेले सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहीती उस्मानपुरा पोलिसांना कळाली.

दहावीनंतर चोरट्यांच्या शाळेत
मुकेशचेवडील सेंट्रिंगची कामे करतात. दहावी पास झाल्यानंतर मुकेशला गावाच्या बाजूला राहाणाऱ्या काही भुरट्या चोरांची संगत लाभली. लवकर पैसे मिळवून श्रीमंत व्हायचे स्वप्ने पाहणारा मुकेश सुरुवातीला घरफोडी करताना कोणी येतेय का हे पाहण्यासाठी बाहेर उभा रहायचा. असे करता करता तो टोळीचा म्होरक्या झाला. त्याच्याकडून ९४ ग्रॅम सोने, पुण्यातील बारामती येथून चोरीला गेलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीत कोण कोण आहे, औरंगाबादेतील घरे त्यांना कोण सांगतो याचा तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...