आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय योजनांच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा : डाॅ.भापकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र आणि राज्यातील सरकार समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करत आहे. जलयुक्त शिवाराची मोहीम त्यापैकीच एक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागही लाभला आहे. शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची साथ मिळाली तरच ते यशस्वी होऊ शकतील, असे मत विभागीय आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले. 
 
टिळक नगरातील जीवन विकास ग्रंथालयाच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “प्रशासन आणि लोकसहभाग’ या विषयावर ते बोलत होते. निवृत्त प्राचार्य प्रा. जीवन देसाई यांनी डॉ. भापकर यांचा परिचय करून दिला. 
 
डॉ. भापकर म्हणाले, ३१ वर्षांच्या सेवेत २० ठिकाणी २७ बदल्या झाल्या. काही बदल्या तर अवघ्या महिन्यांतही झाल्या. मात्र, प्रत्येक ठिकाणी कामाचा आनंद घेतला. सततच्या बदल्यांमुळे नवीन भाग पाहता आले. तेथे विकास करता आला. 
 
ते म्हणाले घरापासून शहर, राज्य आणि देशाचे व्यवस्थापन म्हणजे प्रशासन, तर शासन म्हणजे ध्येयधोरणे ठरवणारी यंत्रणा. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना १० ते ची ड्यूटी केली नाही, तर जीव ओतून, झोकून काम केले. सर्व माणसे एकसारखी असतात. त्यांची रचना एकसारखी असते. सर्वांकडे एकसारखा दिवस असतो. मात्र जे जिद्दीने कार्यरत राहतात, मोठी स्वप्ने पाहतात तेच मोठे काम करू शकतात. 
 
डॉ. भापकर म्हणाले, सरकार देशात सुधार घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करत आहे, परंतु लोकसहभागाशिवाय हे शक्य नाही. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ने ३० तालुके दत्तक घेतले आहेत. श्री. श्री. रविशंकर यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग ५० तालुक्यांतील पाण्याची समस्या सोडवणार आहे. लोकसहभागातून गेल्या वर्षी जलव्यवस्थापनासाठी ५०० कोटी रुपये उभारले होते.
 
सरकारनेही ४००० कोटींचा निधी दिला. सरकार आणि लोकांनी हातात हात घेऊन काम केले तर मोठे बदल घडू शकतात. स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर पाणी व्यवस्थापनासाठी राज्यात उभारलेली चळवळ सर्वात मोठी चळवळ होती, असेही त्यांनी सांगितले. ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक डॉ. रा. श. बालेकर यांनी सूत्रसंचालन, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. 
 
गुणवत्तेशी तडजोड नको 
यंदा चांगला पाऊस झाला असला तरी पाण्याची सुरक्षितता आणि व्यवस्थापन हे आव्हान आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे हेही मोठे आव्हान आहे. गुण कमी मिळाले तरी चालेल, पण गुणवत्तेशी तडजोड नको, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. नीती, समता आणि एकतेचे प्रशासन म्हणजे सुशासन. शिवाजी महाराजांनी केले ते सुशासन होते, असे ते म्हणाले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...