आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींचा निधी मी आणला हेच वास्तव, पालकमंत्री रामदास कदमांचा भाजपला टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर याचे श्रेय घेण्यासाठी भाजपच्या वतीने शहरात होर्डिंग्ज लावण्यात आले होते. भाजपमुळेच पैसे आले, असा दावा त्यात करण्यात आला होता. याचा पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी समाचार घेतला. कोणीही होर्डिंग्ज, पोस्टर लावावेत, त्याने काहीही फरक पडणार नाही, हा निधी मीच मिळवून दिला हे वास्तव बदलणार नाही, असे कदम म्हणाले. 

कदम यांच्या हस्ते मंगळवारी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या बालाजीनगर वाॅर्डातील रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे तसेच तसेच उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या मयूरबन वाॅर्डातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, हे पैसे मीच मिळवून दिले, हा शासनाचा पैसा आहे, माझ्या खिशातून दिलेले नाहीत. मात्र भाजपकडून पोस्टरबाजी झाली. चांगली गोष्ट आहे. महापौर भगवान घडमोडे यांनी श्रेय घेतलेच पाहिजे, कारण ते पदावर आहेत. असे केले तरी हा निधी मीच मिळवून दिला, हे वास्तव बदलणार नाहीच. पालकमंत्री झाल्यापासून महानगरपालिकेची राज्य शासनाकडील कामे मीच करतो, यापुढेही जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार संदीपान भुमरे, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, पालिका आयुक्त दीपक मुगळीकर, नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, नगरसेविका अंकिता विधाते आदी उपस्थित होते. 

भ्रष्ट अधिकाऱ्यांना कामावर घेऊ नका 
पालिकेतीलकाही अधिकारी सध्या निलंबित आहेत. त्यांना कामावर घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर बोलताना कदम म्हणाले, भ्रष्ट अधिकाऱ्यांना परत येऊ देऊ नका. चांगल्या अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. 

आत्मनिर्भर व्हा 
आणखीनिधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कदम यांनी दिले खरे; दुसरीकडे त्यांनी दमही भरला. ते म्हणाले, तुमची महानगरपालिका फक्त शासनाच्या पैशांवर जगतेय. असे किती दिवस चालणार आहे? पालिकेने आपले उत्पन्न वाढवले पाहिजे. उत्पन्न वाढले तरच शहरात विकासकामे होऊ शकतील. 

खा. खैरे यांना चिमटा, पक्षातून लोक का गेले? 
यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापौर घडमोडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, माजी उपमहापौर संजय केणेकर ही मंडळी भाजपमध्ये असली तरी ते अाधी शिवसैनिकच होते. त्यामुळे ही मंडळी आजही आपलीच आहेत, असा उल्लेख केला. त्यावर ही माणसे जर आपलीच होती तर दुसऱ्या पक्षात गेलीच कशी, असा सवाल कदम यांनी केला आणि ‘खैरे साहेब, माणसे जपायला शिका’ असा सल्लाही दिला. ही माणसे आपलीच होती तर ती आपल्याकडे परत कशी येतील यासाठी प्रयत्न करण्याचेही सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...