आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबाद: ‘हारुण’ने रहिवासी भागात थाटला आरओ प्लँट, नागरिक त्रस्त...मनपाची एनओसी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहिंसानगरातील रहिवासी भागातील हारुण मुखाती फाउंडेशनचा आरओ प्लँट. या प्लँटचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. (इनसेट) याच प्लँटमध्ये विहिरीचे खोदकाम सुरू आहे. - Divya Marathi
अहिंसानगरातील रहिवासी भागातील हारुण मुखाती फाउंडेशनचा आरओ प्लँट. या प्लँटचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. (इनसेट) याच प्लँटमध्ये विहिरीचे खोदकाम सुरू आहे.
शहरातील‘हारुण मुखाती सोशल फाउंडेशन’ या संस्थेने रहिवासी भाग असलेल्या अहिंसा-बसैयेेनगरात पाणी शुद्धीकरणाचा आरओ प्लँट उभारला आहे. मनपाची एनओसी नसताना त्यांनी हा प्लँट सुरू केला. एवढेच नव्हे तर भूगर्भशास्त्र विभागाची परवानगी घेता खोदकाम करून विहीर खोदली जात आहे. या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टोन क्रशरच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असून या भागातील नागरिक त्यामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. प्लँटसाठी पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने परिसरातील बोअर आटण्याच्या मार्गावर आहेत. तसेच सतत लोडिंग रिक्षा आणि ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. 
 
हारुण मुखाती फाउंडेशन ही स्वत:ला एक सामाजिक संस्था म्हणवते. या संस्थेमार्फत शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेच्या वतीने कपडा बँक सुरू करण्यात आली असून त्याद्वारे गोरगरिबांना मोफत कपड्यांचे वाटप केले जाते. तसेच त्यांनी वॉटर बँकदेखील सुरू केली आहे. मात्र, या वॉटर बँकसाठी ज्या ठिकाणी आरओ (जलशुद्धीकरण) प्लँट सुरू केला आहे, ती जागा रहिवासी आहे. कोणत्याही रहिवासी भागामध्ये एखादा प्लँट सुरू करायचा असेल तर त्यासाठी मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र, या संस्थेला मनपाने एनओसीच दिलेली नाही. याच ठिकाणी पाण्यासाठी खोदल्या जात असलेल्या विहिरीतून बेसुमार उपसा होत असल्याने आजूबाजूच्या बोअरवेल्सचे पाणी आटत आहे. हा बेसुमार उपसा असाच सुरू राहिला तर परिसरातील सर्व बोअर उन्हाळ्यापूर्वीच आटतील. 

अभ्यासावर परिणाम 
अहिंसा नगरातील या आरओ प्लँटच्या आजूबाजूला अनेक अपार्टमेंट्स आहेत. त्यामध्ये रेणुका साई रेसिडेन्सी, राधाकृष्ण अपार्टमेंट, योगेश्वरी सिल्व्हर हाइट्स, विराज एनक्लेव्ह,विश्वराज बॉइज हॉस्टेल आदी इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रोज सकाळी १० वाजता विहिरीचे खोदकाम सुरू केले जाते. खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनच्या आवाजामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी, ट्युशन-हॉस्टेलचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच मशीनच्या व्हायब्रेशनमुळे प्लँटला लागून असलेल्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी सांगितले. 

अहिंसानगरातील रहिवासी भागातील हारुण मुखाती फाउंडेशनचा आरओ प्लँट. या प्लँटचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. (इनसेट) याच प्लँटमध्ये विहिरीचे खोदकाम सुरू आहे. 
माहिती अधिकारामध्ये मी सर्व कागदपत्रे गोळा केली आहेत. त्यानुसार संबंधित संस्थेने सुरू केलेला प्लँट बेकायदेशीर ठरतो. मनपाकडे याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. आता मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तातडीने हा प्लँट बंद करण्यात येऊन नागरिकांना त्रासातून मुक्त करावे. विनोदकुमारजैस्वाल, तक्रारदार

प्रदूषण मंडळाची नोटीस 
प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेता वॉटर प्युरिफिकेशन प्लँट उभारल्याबद्दल आणि भूजल प्राधिकरणाकडून एनओसी घेता विहिरीचे खोदकाम सुरू असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हारुण मुखाती फाउंडेशनला २५ जानेवारी २०१७ रोजी नोटीस पाठवली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरून परवानगी घ्यावी, अन्यथा आपल्याविरुद्ध ‘प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन अॅक्ट १९७४’ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीद्वारे बजावण्यात आले आहे. 

‘भूजल’च्या परवानगीशिवाय विहिरीचे खोदकाम 
रहिवासीभागामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरते. मात्र, संबंधित संस्थेला प्राधिकरणाकडून विहीर खोदण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे माहिती अधिकारामधून उघड झाले आहे. तरीदेखील सामाजिक कार्याच्या नावाखाली स्टोन क्रशरद्वारे विहिरीचे खोदकाम सुरूच आहे. 

मनपाची कारवाईस टाळाटाळ 
या संदर्भात विनोदकुमार जैस्वाल यांनी मनपाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता मागील तीन वर्षांमध्ये संबंधित संस्थेला रहिवासी भागामध्ये आरओ प्लँट उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. तसेच नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी अतिक्रमण विभागाला ही बाब २१ डिसेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये लेखी कळवून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापही मनपाच्या अतिक्रमण विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही. 

ध्वनी प्रदूषणामुळे आम्ही वैतागलो आहोत. संबंधित संस्थेच्या लोकांना याबाबत सांगितले असता फक्त आठ दिवस तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल, असे ते म्हणाले. मात्र, विहिरीतून पाण्याचा उपसा अधिक होत असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीच मिळणार नाही. शिरीषकुलकर्णी 
माझी मुलगीसध्या नीटच्या परीक्षेची तयारी करतेय. मात्र, रोजच्या कर्णकर्कश आवाजामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. दारे, खिडक्या बंद केल्या तरी हा आवाज जात नाही. भिंतीला लागून आमचा फ्लॅट असल्याने आम्हाला सर्वाधिक त्रास आहे. राजेशखरात 
विहिरीतून पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने आमच्या बोअरचे पाणी बंद झाले आहे. मी आठवीपर्यंतच्या मुलांचे टयूशन्स घेते. मात्र, स्टोन क्रशर मशीन्सच्या मोठ्या आवाजामुळे खूप त्रास होतो. सकाळी १० वाजेपासून संध्याकाळपर्यंत हा आवाज येतो. तृप्तीजाधव 

काय म्हणतात जबाबदार? 
संबंधितसंस्थेला नोटीस बजावल्यानंतर त्यांनी आच्याकडून एनओसी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. मनपाची एनओसी नसताना प्लँट सुरू केला असेल, त्यांना परवानगी देता येत नाही. मात्र, आम्ही कागदपत्रे तपासून नियमानुसारच निर्णय घेऊ. जे.ए. कदम
 
पुढील स्लाईडवर वाचा,  परिसरातील रहिवासींच्या प्रतिक्रीया... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...