आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे हृदय मुंबईत धडधडले! ब्रेनडेड शिक्षकाच्या हृदयाचे तरुणात प्रत्यारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद, मुंबई, पुणे- मेंद मृत झालेल्या ३९ वर्षीय शिक्षकाचे हृदय शनिवारी संध्याकाळपासून मुंबईतील २८ वर्षीय तरुणाच्या छातीत धडधडू लागले आणि औरंगाबादच्या वैद्यकीय इतिहासात आणखी एक अध्याय लिहिला गेला.

दोन आठवड्यांपूर्वी राम मगर याचे यकृत व किडन्या तीन रुग्णांत प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी झाला होता. तेव्हा विमान सेवेअभावी हृदय प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. मात्र, त्या प्रयत्नांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा आत्मविश्वास वाढला.

बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील सुनील बुधवंत औरंगाबादेत उपचार सुरू असताना शुक्रवारी ब्रेनडेड झाल्यानंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय नातलगांनी घेतला. त्यानंतर धूत रुग्णालयाने तयारी केली. सकाळी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. दोन्ही किडन्या, यकृत व हृदय वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवले. सुनीलचे यकृत साडेतीन तासांत रुग्णवाहिकेतून पुण्याच्या रुबी हाॅस्पिटलमध्ये पाेहाेचले. सुनील यांच्या दोन किडन्यांपैकी एक किडनी धूतमध्ये औरंगाबादच्याच एका ४४ वर्षीय पुरुषाला तर दुसरी किडनी बजाज रुग्णालयात एका ४५ वर्षीय पुरुषाला बसवली. संबंधित. दिव्य सिटी

अवघ्या ७९ मिनिटांत हृदय पोहोचले
धूत हाॅस्पिटलमधून सकाळी १०.२२ वाजता हृदयाचा प्रवास विमानतळाकडे सुरू झाला. ३ मिनिटांत ते विमानतळावर पोहोचले. त्यानंतर चारच मिनिटांत विमानाने उड्डाण केले. ११.१९ वाजता हे हृदय मुंबई विमानतळावरून रवाना झाले व ११.४१ वाजता फोर्टीस रुग्णालयात पोहोचले. मुंबईतीलच २८ वर्षीय तरुणाच्या शरीरात त्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया साडेचार वाजता संपली. डाॅ. अन्वय मुळे यांनी या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले.