आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाशौचालय हॉटेल, ढाब्यांवर कारवाई, आरोग्य विभागाकडून 209 जणांना नोटिसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महामार्गावर अथवा राज्य रस्त्यावर असूनही शौचालय बांधलेल्या ढाबा हॉटेलांवर जिल्हा आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील तब्बल २०९ हॉटेल, ढाबाचालकांना नोटिसा देण्यात आल्या. शौचालय बांधण्याबाबत त्यांच्याकडून जबाब नोंदवून घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे हे स्वत: झोकून देऊन या मोहिमेत काम करत असल्याने सर्वच विभाग कामाला लागले आहेत. यासाठी विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, राज्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल, ढाब्यावर शौचालय नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीईओ ननावरे यांच्या सूचनेनंतर जिल्हा आरोग्य विभागाने हॉटेल, ढाबे तपासणीची मोहीम हाती घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी विविध पथके तयार करून सर्व तालुक्यांमध्ये तपासणी मोहीम राबवली. जिल्हाभरात एकूण ५२५ हाॅटेल ढाब्यांची तपासणी झाली असून यापैकी ३०२ जणांकडे शौचालये आहेत, तर २२३ जणांकडे शौचालये नसल्याचे दिसून आले. शौचालय नसलेल्यांपैकी २०९ जणांना आरोग्य विभागाने नाेटिसा काढल्या अाहेत. त्यांच्याकडून महिनाभरात शौचालय बांधकाम करून घेण्याचे लेखी जबाब घेण्यात आले आहेत. त्यांना शौचालय बांधण्यासाठी मुदतही देण्यात आली. 

..तर दंडात्मक कारवाई 
तपासणीनंतरनोटीस देऊन शौचालय बांधण्यासाठी मुदत दिलेल्या हॉटेल, ढाब्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा शौचालय आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार अाहे. 

होऊ शकतो परवाना निलंबित 
हॉटेल, ढाब्यावर स्वच्छतागृह असणे बंधनकारक अाहे. स्वच्छता गरजेची आहे. दिलेल्या मुदतीत हॉटेल, ढाबेचालकांनी शौचालय बांधल्यास त्यांच्यावर अन्न प्रशासनाकडूनही कारवाई होईल. परवानाही निलंबित अथवा रद्द केला जाऊ शकतो, असे अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी सांगितले. 

प्रतिमा मलिन होते 
- राष्ट्रीय,राज्य महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी हॉटेलांमध्ये जेवणासाठी थांबतात. अशा वेळी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. महिला प्रवाशांचाही कुचंबणा होते. त्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते याचे भान ठेवून हॉटेल, ढाबेचालकांनी शौचालये बांधावीत. -नामदेव ननावरे, सीईओ, जिल्हा परिषद. 

अहवाल तयार 
- ढाबे, हॉटेल तपासणीचा अहवाल तयार असून आढावाही वेळोवेळी घेण्यात येत आहे. साथरोग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार केली आहेत. फॉलोअप घेण्यात येत आहे. शौचालय नसल्यामुळे अारोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचीही जागृती करण्यात येत आहे.
-डॉ. संदीप सांगळे, आरोग्य अधिकारी. 

केज तालुक्यात सर्वाधिक ६० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर पाटोदा तालुक्यात ०९, अंबाजोगाई- १५, बीड- ३१, धारूर - ९, माजलगाव - १०, शिरूर - १७, परळी - १४, वडवणी - ०८, आष्टी - ७, गेवराई - २९ अशा एकूण २०९ जणांना शौचालय नसल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. काही जणांना तोंडी सूचना देण्यात आल्या असून २१६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...