आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर: अवैध उपसा, तीन कोटींचा दंड, नगर जिल्ह्यातील तस्कराची दहशत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील डोणगाव येथील गोदावरी नदीपात्रात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून खुलेआम बेसुमार वाळूचोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या वाळूमाफियावर शासकीय वाळूघाटातून ११०० ब्रास वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्याबद्दल वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप यांनी बाजारभावाच्या पाचपट याप्रमाणे पावणेतीन कोटींची दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे गोदापात्रातून वाळूची हेराफेरी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे.   

गोदावरी नदीपात्रात बेसुमारपणाने अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांची टोळी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे वेळोवेळी समोर आले होते. त्यामुळे तालुक्यातील डोणगाव नदीपात्रात वाळूमाफिया टोळीने प्रस्थापित केलेली दहशत मोडून काढण्याबरोबर वाळूचोरीला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप येथे धडक कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पथकासोबत गेले होते. 
 
त्या वेळी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या पथकाला वाळू तस्करांनी दादागिरी करून शिवीगाळ करत “येथे थांबू नका, तुमच्या जिवाला धोका होईल’ अशी भाषा वापरून नदीतून पिटाळून लावण्यासाठी  दादागिरी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या या सरकारी वाळूघाटावर मक्तेदारी प्रशासनाची की वाळू तस्करांची, असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वाळूमाफियांवर धडक कारवाईची भूमिका  घेतली.  
 
नगर जिल्ह्यातील तस्कराची दहशत... 
डोणगाव येथील नदीपात्रात अवैध वाळूचोरीवर धडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप पोलिस बंदोबस्तात गेले होते. पथकाला नदीपात्रातून पाच ते सहा ट्रॅक्टरमध्ये मजुरांकडून खुलेआमपणे वाळूचे उत्खनन करून भरत असल्याचे आढळून आले. पथकातील तलाठी चापानेरकर यांनी ट्रॅक्टरचालकांना जागेवरच उभे करण्याचे सूचित केले असता चालकांनी सुसाट वेगाने ट्रॅक्टर पळवले. यात एक ट्रॅक्टर उलटले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...