Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Illegal Sand Transport Vehicles To Be Seized And Sold

औरंगाबाद - अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून विकणार

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 07:40 AM IST

  • औरंगाबाद - अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून विकणार
औरंगाबाद- मराठवाड्यातील अवैध वाळू वाहतूक काहीकेल्या थांबत नसल्यामुळे अशी वाहने जप्त करून त्यांची थेट विक्री करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या वर्षभरात अवैध वाळू वाहतुकीची तब्बल ५५४० प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे लिलाव करता अवैध वाळू वाहतुकीचा पॅटर्न बनलेल्या मराठवाड्यासाठी भापकरांनी हा रामबाण उपाय सांगितला असला तरी प्रत्यक्षात असे करता येते का आणि तशी कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अवैध उत्खनन रोखण्यासाठी सध्या वाहनात असलेल्या वाळूच्या किमतीच्या पाचपट दंड वसूल केला जातो. मात्र, अवैध वाळू वाहतूकदारांवर त्याचा फारसा परिणाम होत नसून अवैध वाहतूक सुरूच आहे. शिवाय वाळूपोटी मिळणारा मोठा महसूलही बुडत असल्याने आता भापकर यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे.
वर्षभरात१५ कोटींचा दंड वसूल :गेल्या वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीची ६७०, जालना ३०४, परभणी ६५३, हिंगोली ३५३, नांदेड १३६६, बीड ४५७, लातूर १३७९, उस्मानाबाद ३१८ प्रकरणे घडली. यामध्ये १५ कोटी २३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यत ३०३ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. औरंगाबादमध्ये सर्वाधिक ७८, जालन्यामध्ये १०४, नांदेड ५८ आणि परभणीत ४६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय ९२ जणांना अटक आणि १३९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तरीही अवैध वाळू उपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
वाहने जप्त करून विक्री करणार :मराठवाड्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र वाळू तस्करी सुरू आहे. त्यामुळे आता अशा वाहनाची जप्ती करून ते विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अवैध वाळू वाहतूकदारांवर वचक बसेल, असे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

Next Article

Recommended