आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाताला हिसका देऊन पळणारे आरोपी जेरबंद, वैजापूरच्या सत्र न्यायालयातून पळाला होता आरोपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर  - गुन्ह्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न पोलिस व न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. पोलिस व कर्मचाऱ्यांनी लांबवर पाठलाग करून अवघ्या पंधरा मिनिटांत फरार आरोपीला जेरबंद करण्याचे थरारनाट्य शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.  
 
दिलीप विठ्ठल राठोड (२२, रा. टाकरवण तांडा नंबर १, ता. माजलगाव, जि. बीड) असे पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात वाळूज एम.आय.डी.सी. पोलिसांनी त्याला ५ मे २०१६ रोजी अटक केली होती. 
 
आरोपी दिलीप विठ्ठल राठोड याला अटकेनंतर त्याची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सदरील गुन्ह्याच्या सुनावणीसाठी पोलिसांनी त्याला हर्सूल कारागृहातून शुक्रवारी वैजापूरच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात आणले होते. 
 
दुसऱ्या मजल्यावरून केले  पलायन : न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर उभे करण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्या हातातील बेडी काढली होती. ही संधी साधून आरोपी दिलीप यांने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन दुसऱ्या मजल्यावरून पलायन केले.
 
 दरम्यान, संबंधित पोलिसांनी आरडाओरड केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. रयतूवार, एच. एस. शिरसाठ, इतर पोलिस कर्मचारी, न्यायालयाचे बेलिफ लक्ष्मीकांत दंडारे यांनी पाठलाग करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील सावतानगर वसाहतीत आरोपीच्या शिताफीने मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांच्या निगराणीतून आरोपी पळून गेल्यामुळे भांबावून गेलेल्या पोलिसांनी आरोपी पकडल्यामुळे सुटकेचा सुस्कारा सोडला.  
 
यापूर्वीही आरोपी पळून गेला होता...  
खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी दिलीप यापूर्वी १४ जुलै २०१६ रोजी त्याला औरंगाबाद येथे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांचा डोळा चुकवून पसार झाला होता. याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई   करण्यात आल्याची महिती पोलिस सूत्रांनी दिली. त्याचा दुसऱ्यांदा पळून जाण्याचा प्रयत्न फोल ठरला.
बातम्या आणखी आहेत...