आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील दहावी पास, आई चौथीपर्यंत शिकली; नोकरीसाठी भारतात मागितले 30 लाख, मुलगा गेला तुर्कस्तानात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईनाथ आणि त्यांची आई - Divya Marathi
साईनाथ आणि त्यांची आई
औरंगाबाद- महाराष्ट्रासह देशभरात ३५ ठिकाणी मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी २० ते ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. शेत विकल्याशिवाय एवढी रक्कम जमवणे कठीण होते. त्यामुळे भ्रष्ट मार्गाने देशातील नोकरी पत्करण्याऐवजी तुर्कस्तान येथील विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याचे डॉ. साईनाथ चपळे (३४) यांनी सांगितले. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावच्या उच्चशिक्षित तरुणाची ही भन्नाट यशकथा असून येथील सदोष यंत्रणेवरही त्यांनी कोरडे ओढले आहेत. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि तुर्कस्तानतर्फे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय भाषा, साहित्य, संस्कृती परिषदेनिमित्त डॉ. चपळे शहरात आले आहेत. त्या वेळी त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने खास बातचीत केली. दहावी उत्तीर्ण वडील विठ्ठलराव आणि जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कांताबाई यांच्या पोटी जन्मलेल्या साईनाथ यांचे संपूर्ण शिक्षण साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावातील जि.प. शाळेत झाले. त्यानंतर धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले. 
 
तेलंगणा येथील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातून हिंदी विषयात त्यांनी एमए, एमफिल आणि पीएचडी पूर्ण केली. हैदराबादलाच अनुवाद, जनसंवाद वृत्तपत्रविद्या मध्येही त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर महाराष्ट्रात १०, देशभरात २५ अशा ३५ ठिकाणी सहायक प्राध्यापकपदासाठी मुलाखत दिली. पण प्रत्येक ठिकाणी २० ते ३० लाख रुपयांची निवड समितीने लाच मागितली. चीन येथील बीजिंग फॉरेन लँग्वेज स्टडीज युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांनी शोधनिबंध सादर केला. 
 
केंद्रीय विद्यापीठामार्फत मिळालेल्या दीड लाखाच्या अनुदानातून पहिल्यांदा विदेशात जाण्याची संधी मिळाली. १५ जानेवारी २०१५ रोजी तुर्कस्तानच्या एर्जीएस विद्यापीठातील भाषा विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि उपअधिष्ठातांनी स्काइपद्वारे त्यांची मुलाखत घेतली. १४ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना एर्जीएस विद्यापीठाच्या कुलगुरूंनी निवड केल्याचे कळवले. तेव्हापासून ते तुर्कस्तान येथील कायसेरी शहरातील विद्यापीठात भाषा विषयाचे अध्यापन करत आहेत. ‘भारतीय भाषा, संस्कृती अन् आंतरराष्ट्रीय संबंध’ विषय हिंदी, इंग्रजी आणि तुर्की भाषेमध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवतात. 

४७५ विभागांचे विद्यापीठ: १९७१दरम्यान स्थापन झालेल्या एर्जीएस विद्यापीठात एकूण ४७५ विभाग आहेत. हजार प्राध्यापक आणि साडेतीन हजार शिक्षकेतर कर्मचारी या विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. जगातील प्रत्येक देशातील प्रातिनिधिक स्वरूपात येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भाषेचे शिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांना हिंदी विषय तुर्कीमध्ये शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि तुर्की आदी भाषांचे त्यांना सखोल ज्ञान असून आता भारतात परतण्याची इच्छा नसल्याचेही ते म्हणाले. 
 
भारतातील गुरू-शिष्य परंपरा वाईट 
- भारतात केंद्रीय विद्यापीठांचा अपवाद वगळला तर प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक शोषण केले जाते. पीएचडीचे गाइड तर खूपच छळतात. तुर्कस्तान येथे मात्र विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते हे फक्त मित्रांप्रमाणे असते.
-डॉ. साईनाथ चपळे, सहायक प्राध्यापक, तुर्कस्तान 
पुढील स्लाईडवर पाहा, साईनाथ यांची तुर्कस्तानातील फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...