आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: आैरंगाबादेतील भारत पर्यटन कार्यालय 6 महिन्यांत बंंद होणार; दिल्लीत झाला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - पर्यटकांना देशभरातील पर्यटनाविषयी  माहिती देणारे औरंगाबादेतील भारत पर्यटनचे (इंडिया टुरिझम) कार्यालय सध्या अंतिम घटका मोजत आहे. एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एकीकडे भरारी घेत असताना २०१३ पासून इंडिया टुरिझमच्या कार्यालयास अवकळा येण्यास सुरुवात झाली. या चार वर्षांत या कार्यालयाला एकही पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. या स्थितीत हे कार्यालयच गुंडाळण्याचा निर्णय भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
१९५६ ची स्थापना : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाअंतर्गत ‘भारत पर्यटन’ची देशभरात १८ कार्यालये आहेत. यापैकी दिल्ली, आग्रा आणि औरंगाबाद ही कार्यालये १९५६ मध्ये एकाच वेळी सुरू झाली होती. पर्यटकांना देशभरातील पर्यटनस्थळांची माहिती देण्याच्या उद्देशाने याची स्थापना झाली होती. औरंगाबादेत रेल्वे स्टेशन रोडवरील एमटीडीसीच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीत हे कार्यालय आहे. औरंगाबादसह १० जिल्ह्यांचे कामकाज येथून चालते.
 
मंत्रालयाचा निर्णय : औरंगाबादसह इतर आणखी दोन कार्यालयांचे काम समाधानकारक नाही व पर्यटनवृद्धीचे ध्येय या माध्यमातून साध्य होत नसल्याचा ठपका ठेवत पर्यटन मंत्रालयाने देशभरातील तीन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली. याबाबत मुंबईचे सहायक संचालक जगदीश ठोंबरे आणि पर्यटक माहिती अधिकारी इशरत आलम यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
 
२०१३ पासून पद रिक्त
या कार्यालयात २००६ ते २०१३ या काळात आर.आर.व्ही राव सहायक संचालक होते. या काळात भारत पर्यटनने अनेक कार्यक्रमांत सहभाग नोंदवला. राव यांची बदली झाल्यानंतर करणसिंग आणि मृत्युंजय मिश्रा दिल्लीहून आले. परंतु वर्षाच्या आतच परत गेले. नंतर भावना शिंदे, शोभा कुमार आणि जितेंद्र जाधव यांच्याकडे मुंंबई कार्यालयासोबत अतिरिक्त कार्यभार होता. सध्या मुंबईचे सहायक संचालक जगदीश ठोंबरे यांच्याकडे कार्यभार अाहे.
 
स्टाफही निम्म्यावर
कार्यालयात एकूण ९ कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी काही निवृत्त झाले. काहींची बदली झाली. नंतर नियुक्त्या झाल्याच नाहीत. आता चौघेच आहेत. एक महिला कर्मचारी बाळंतपणाच्या रजेवर. त्यातही एखाद्याची सुटी असेल तर मग दोघेच असतात.
बातम्या आणखी आहेत...