आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजपूरकरांचा भूमिपुत्राला अखेरचा निरोप: आईने तिरंगा कवटाळला, विकास समुद्रे अमर रहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेलिकॉप्टरद्वारे धारूर येथील एसटी महामंडळाच्या अागारामध्ये हेलिपॅडवर शहीद विकास समुद्रे यांचे पार्थिव आणण्यात अाले. - Divya Marathi
हेलिकॉप्टरद्वारे धारूर येथील एसटी महामंडळाच्या अागारामध्ये हेलिपॅडवर शहीद विकास समुद्रे यांचे पार्थिव आणण्यात अाले.
गांजपूर (ता.धारूर) - भारतमाता की जय, अमर रहे अमर रहे, विकास समुद्रे अमर रहे , जब तक सूरज चाँद रहेगा, शहीद विकास समुद्रे का नाम रहेगा अशा घोषणा देऊन ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी भारतीय सैन्यदलातील जवान विकास पांडुरंग समुद्रे यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. काश्मिरात हिमस्खलनामुळे शहीद झालेले समुद्रे यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी धारूरसह बीड जिल्ह्यातील देशप्रेमी नागरिक गांजपूरला लोटले होते. 
 
गांजपूर येथील शहीद विकास समुद्रे हे सैन्यदलाच्या मूळ युनिट १८ रेजिमेंटमध्ये सध्या ५१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये सापडून ते शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पिटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारीला सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारूर येथे आणण्यात आले. येथील शिवाजी चौकात नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर जवानाचे पार्थिव धारूरहून रुग्णवाहिकेतून गांजपूर येथे आणण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार्थिव ठेवल्यानंतर सरपंच, सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तिरंग्यातील पार्थिव गावात आणताच एनसीसी, स्काऊट गाइडच्या पथकांनी ढोल-ताशांच्या गजरात “अमर रहे अमर रहे शहीद विकास समुद्रे अमर रहे’ अशा घोषणा देऊन अंत्ययात्रेत सहभाग घेतला. 
 
आईने तिरंगा कवटाळताच अश्रू अनावर 
तिरंग्यात लपेटलेले शहीद विकास समुद्रे यांचे पार्थिव जेव्हा सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराच्या स्थळी आणले, अधिकाऱ्यांनी पेटीवरील तिरंगा विकास यांच्या आई जनाबाई यांच्याकडे दिला, तेव्हा जनाबाई यांनी तिरंगा छातीशी कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तेव्हा उपस्थित निःस्तब्ध झाले. विकास यांच्या पार्थिवावर भाऊ परमेश्वर यांनी अंत्यसंस्कार केले. विकास यांना एक महिन्यांची मुलगी आहे. 

गावातील रस्त्यांवर फुलांची रास 
शहीद विकास समुद्रे यांचे पार्थिव गावात येणार असल्याने गावातील प्रमुख रस्त्यावर पुलांची रास अंथरण्यात आली होती. गावात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची धावपळ सुरू होती. गावातील व्यापारी दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून विकास यांना श्रद्धांजली अर्पण केली. धारूर शहरात सकाळी हेलिकॉप्टरने विकासचे पार्थिव आणण्यात आले तेव्हा आगार कार्यालयापासून धारूर महाविद्यालयापर्यंत महिला, नागरिकांची गर्दी झाली होती. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, पोलिस सैनिकांकडून मानवंदना...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...