आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: अनंत अडचणी तरी नव्या वर्षात जगण्याची नवी उमेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गेली पाच वर्षे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. कधी संकटे नसली तरी शासनाचे निर्णय आणि शेतमालाचे घसरलेले बाजारभाव अशी सुलतानी संकटेही उभी असतातच. अशा अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत बऱ्या वाईट आठवणींना निरोप देत शेतकरी नव्या वर्षाचे स्वागत करत आहेत. वर्ष बदलले असले तरी दैनंदिन जगण्यातल्या समस्या मात्र कायम राहणारच आहेत. परिस्थितीची ही जाणीव असतानाही नव्या वर्षात नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने संकटांचा सामना करण्याचा निश्चय या शेतकऱ्यांनी केला आहे.
   
परतूर तालुक्यातील सिंगोना येथील बापूराव सोळंके यांनी मोठ्या खर्चाने मोसंबीची बाग लावली. आता उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा असतानाच २०१६ च्या सुरुवातीलाच पडलेल्या दुष्काळाने बाग जळाली. झाडे वाळत असताना हतबलतेने पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता... चार पैसे मिळण्याचे दूरच, परंतु वाळलेली झाडे तोडण्यासाठी त्यांना ५० हजार रुपये खर्च करावा लागला. मोसंबीची बाग काढून आता साेयाबीनची पेरणी आणि कपाशीची लागवड केली.. अवेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीन काळे पडले आणि त्याचे भाव घसरले.. दुसरीकडे कापूस बाजारात घेऊन जात असतानाच नोटाबंदी झाली. मग व्यापाऱ्यांनी भाव पाडूनच कापसाची खरेदी केली.

असे होते संकटांचे दृष्टचक्र
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जानेवारीच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवण्यास सुरुवात झाली. मार्चअखेरीस तीव्र परिस्थिती निर्माण झाली. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि हाताला काम या प्रमुख तीन गोष्टींसाठी अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली. पावसाळ्यात चांगला पाऊस झाला मात्र जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती वाहून गेली तर काही ठिकाणी जमीन खरवडली. घनसावंगी तालुक्यात हे संकट अधिक तीव्र होते.

नोटाबंदीचा फटका   
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला. जुन्या नोटा स्वीकारल्या तर अधिकचा दर आणि नव्या नोटांचा आग्रह असेल तर क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपये कमी दर अशी वेळ आणली गेली. मात्र हातात पैसाच नसल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठीही तयारी दर्शवत वेळ मारून नेली, तर काही शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्यात आले.

हिरव्या मिरचीने दिला तडका
नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच इतर संकटांनीही सरत्या वर्षात शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली. मिरची उत्पादनासाठी मराठवाड्यात ओळख असलेल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. मे महिन्याच्या अखेरीस १० हजार रुपये दराने विकली जात असलेली मिरची महिनाभरातच पाचशे रुपये क्विंटल इतकी खाली आली, तर मागणीच नसल्याने शेतकऱ्यांवर मिरची फेकून देण्याची वेळ आली.   

जिद्द सोडणार नाही   
चार वर्षांचा दुष्काळ आणि त्यापाठोपाठ शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. लागोपाठच्या संकटांनी कंबरडेच मोडले आहे. या नुकसानीचा मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे. नवीन वर्ष सुरू हाेत असताना संकटे कमी व्हावीत, असे वाटते. मात्र संकट कितीही मोठे असले तरी डगमगून न जाता त्याचा सामना करावाच लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिद्द तर सोडणार नाहीच.
- प्रकाश बागल, शेतकरी, सिंगोना   
बातम्या आणखी आहेत...