आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : कडाचा प्रस्ताव; खरीप वाचवण्यासाठी जायकवाडीतून पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यात खरीप पिके संकटात आहेत. ती वाचवण्यासाठी जायकवाडीच्या लाभक्षेत्रातून पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर कडा प्रशासनाने खरिपाची एक पाणीपाळी देण्याचा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीकडे पाठवला आहे. पाणी सोडण्याबाबत निर्णय झाल्यास औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टरला लाभ होणार आहे. 
 
पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. विशेषत: जायकवाडी धरणक्षेत्रात अवलंबून असलेल्या चारही जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने तातडीने पाणी सोडण्याची मागणी आमदार संदिपान भुमरे, आमदार राजेश टोपे यांनी केली आहे. त्यामुळे कडा प्रशासनाने पाणी सोडवण्याबाबत प्रस्ताव पाठवला असून त्यावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. 
 
पेरण्यासाठीही फायदा : चारहीजिल्ह्यांत पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत. जायकवाडीवर लाख ८३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. डाव्या कालव्यातून लाख ४१ हजार ६४० तर उजव्या कालव्यातून ४१६८२ हेक्टर सिंचन होते. 
 
५.५ टीएमसी लागणार : कडाच्या प्रस्तावानुसार डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून ४० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल. त्यासाठी ८० दलघमी पाणी लागेल. उजव्या कालव्यातून दहा हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून त्यासाठी २० दलघमी पाणी लागेल. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेतून ७५०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून त्यासाठी ५० दलघमी पाणी लागेल. सर्व ५७ हजार हेक्टरसाठी १५० दलघमी पाणी लागणार आहे. 
 
आमदार म्हणतात... 
खरीप वाचू शकेल 
महिनाभरापासूनपाऊसझाल्याने जालना जिल्ह्यात पिकांनी माना टाकल्या असून दुबार पेरणीचे संकट उद््भवण्याची भीती आहे. आता पाणी सोडले तरच पिके वाचतील. त्यामुळे कडा विभागाकडे मागणी केली आहे. 
- राजेश टोपे, आमदार घनसावंगी 
 
तातडीने निर्णय घ्या 
पावसाअभावी पैठण तालुक्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तातडीने पाणी सोडले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अन्यथा खरीप हातून जाईल. संरक्षित पाणी पाळी सोडल्यास पेरण्यांसाठी फायदा होईल. 
- संदिपान भुमरे, आमदार पैठण 

अत्यल्प पाऊस 
औरंगाबाद जिल्ह्यात १६३ मिमी पाऊस झाला असून अपेक्षित सरासरीच्या हे प्रमाण ७६ टक्के आहे. पैठण तालुक्यात सर्वात कमी ८५ मिमी पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात १८७ मिमी (अपेक्षित सरासरीच्या ८४ टक्के), अंबड तालुक्यात १३७ मिमी पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यात अवघा १४५ मिमी पाऊस झाला असून अपेक्षित सरासरीच्या हे प्रमाण ६३ टक्के आहे. पाथरी १०९ तर गंगाखेड १२५ मिमी कमी पाऊस झाला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)