आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी, माजलगाव धरणातून 8 पाणी पाळ्या; दुधना, नांदूरमधूनही सुटणार पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी, दुधना, माजलगाव, नांदूर-मधमेश्वर या प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. या वेळी जायकवाडी व माजलगाव धरणातून रब्बीसाठी ८ पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले.  १५ नोव्हेंबरपासून हे पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी : १.८५ लाख हेक्टरला फायदा : कडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणातून रब्बीसाठी ४ व उन्हाळी पिकासाठी ४ पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत.  या पाण्यामुळे रब्बीसाठी १ लाख ३५ हजार हेक्टर तर उन्हाळीसाठी ५० हजार हेक्टरला फायदा होणार आहे. रब्बीसाठी साधारण १०८४ दलघमी तर उन्हाळीसाठी ४५० दलघमी इतके पाणी लागते. साधारण ५४ टीएमसी पाणी जायकवाडीतून पाणीपाळीसाठी वापरले जाईल. १५ नोव्हेंबरला हे पाणी सोडले जाईल. माजलगाव धरणात सध्या ३१० दलघमी साठा आहे. धरणातून रब्बी ४ व उन्हाळीसाठी ४-४ पाणी पाळ्या देण्यात येतील. ३० हजार हेक्टरवर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे. 

दुधना : १४ हजार हेक्टरला फायदा : दुधना धरणात सध्या १८६ दलघमी( ७७ टक्के) पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून चार पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत. यामध्ये रब्बीसाठी दोन आणि उन्हाळी दोन पाणी पाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये रब्बीतून १३ हजार ५०० तर उन्हाळीसाठी १३५० असे १४,८५० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. यासाठी १२१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. तर नांदुर-मधमेश्वर प्रकल्पातून रब्बीसाठी दोन आणि उन्हाळी एक अश्या तीन पाणी पाळ्या देण्यात येणार आहे. यामध्ये  रब्बीसाठी १८१२५ आणि उन्हाळी १३५८१ असे ३१७०६ हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे.
 
या पिकांना फायदा 
रब्बी हंगामात मराठवाड्यातील  गहू, ज्वारी, हरभरा, तसेच ऊस आणि उन्हाळी भुईमूग या पाणी पाळ्यांचा फायदा होणार आहे. तसेच कापूस, तूर या पिकांनाही लाभ हाेईल.
बातम्या आणखी आहेत...