आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलमंत्री खडसे यांच्या आदेशाला केराची टोपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा विभाग भूमी अभिलेखचे उपसंचालक प्रदीप पाटील विभागात जातीय द्वेष, व्यक्तिद्वेष व प्रांतवादी भूमिकेतून काम करत आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना अन्याय केला असून प्रसंगी महसूलमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. बदल्यांमध्ये मनमानी करणाऱ्या उपसंचालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत भुईगळ यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उपसंचालक प्रदीप पाटील हे सातत्याने कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. बदल्या करतानाही त्यांनी कर्मचाऱ्यांना हेतुत: त्रास देण्याच्या उद्देशाने विनंती अर्जाचा विचार न करणे, विकल्प असतानाही बदली न करणे असे प्रकार सुरुवातीपासून केलेले आहेत. यासंदर्भात संघटनेने यापूर्वीही दोन जून २०१५ रोजी भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्त तथा संचालकांना पुणे येथे भेटून पुराव्यासह निवेदन दिले होते व चौकशी करण्याची मागणी केली होती. बदल्यांमध्ये अन्याय झाल्याने काही कर्मचारी दाद मागण्यासाठी न्यायालयातही गेलेले आहेत.
सिल्लोड येथील उपअधीक्षक कार्यालयातील परिरक्षण भू-मापक संजय भगवान सातव यांच्या पत्नी कॅन्सर या असाध्य रोगाने पीडित आहेत. त्यामुळे त्यांनी सिल्लोड येथून जाफ्राबाद (जि.जालना) येथे त्यांच्या मूळ गावाजवळ बदली करण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यांची बदली करण्यात यावी, अशी शिफारस महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावरून महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी म. कि. वाव्हळ यांनीही बदलीस मान्यता दिली होती. मात्र, उपसंचालक प्रदीप पाटील यांनी सातव यांची जाफ्राबाद येथे बदली न करता, तेथील रिक्त पदावर हिरालाल प्रतापसिंग बिघोत यांची बदली केली. विशेष म्हणजे बिघोत यांचा जाफ्राबादसाठी विकल्प नव्हता किंवा विनंती अर्जही नव्हता तरीही कर्मचाऱ्यांची गैरसोय व्हावी, या उद्देशाने उपसंचालक पाटील यांनी या बदल्या केल्या आहेत. पदोन्नत्या देतानाही मनमानी केली आहे, या प्रकरणाची चौकशी करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आदींना दिल्या आहेत.

निवेदन आले नाही
यासंदर्भात उपसंचालक प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क केला असता, माझ्याकडे अद्याप असे निवेदन आले नाही, त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.