आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराला दिले तेजीचे संकेत, गृहप्रदर्शनात आठशेवर घरांची ग्राहकांनी केली नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- क्रेडाईच्या गृह प्रदर्शनात सुमारे ८०० ग्राहकांनी नव्या घरासाठी नोंदणी करून दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या औरंगाबादच्या बाजाराला तेजीचे नवे संकेत दिले आहेत. बांधकाम व्यवसायाप्रमाणेच इतर क्षेत्रातही ग्राहक असाच प्रतिसाद देतील अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

सध्या मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. त्याचा परिणाम यंदा सणाच्या खरेदीवर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याच कारणामुळे बांधकाम व्यवसायही मंदी अनुभवत होता. मात्र, या व्यावसायिकांच्या संघटनेने भरवलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन औरंगाबादकरांनी नवेच संकेत दिल्याचे बाजारपेठेत बोलले जाते आहे. त्यामुळे इलेक्टाॅनिक्स, वस्त्र, फर्निचर, वाहन आणि अन्य क्षेत्रातही अशीचच तेजी असेल, असे म्हटले जाते आहे. त्यासाठी विविध वस्तू खरेदीवर निरनिराळ्या ऑफर, शून्य टक्के व्याजदराने सुलभ हप्त्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीची सोय आणि वित्तीय संस्थांनी स्वीकारलेले लवचिक धोरण याकडेही सकारात्मकतेने पाहिले जाते आहे. वाहन खरेदी करण्यात ग्रामीण भागातील ग्राहकांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे धूत ह्युंदाईचे व्यवस्थापक विकास वाळवेकर म्हणाले. दसऱ्यासाठी ९८ वाहनांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. नवरात्रीत फोक्सवॅगनच्या २५ गाड्यांची विक्री तर ३२ गाड्यांची नोंदणी झाल्याचे बालाजी तळेकर यांनी सांगितले. नवरात्रीत चौकशी वाढल्याने व्यवसाय सुरू झाल्याचे शरयू टोयोटाचे नझीर अहमद यांनी स्पष्ट केले. एलईडी टीव्ही खरेदीत तीस हजार ते दीड लाखाची टीव्ही घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे,असे अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे अरुण जाधव म्हणाले.

वित्तसाहाय्यावर खरेदी
मागीलवर्षी ४० ते ४५ टक्के ग्राहक वित्तसाहाय्य घेऊन वस्तू खरेदी करीत असत. यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी हेच प्रमाण साठ टक्क्यांवर गेल्याचे सानिया डिस्ट्रिब्युटर्सचे पंकज अग्रवाल यांनी सांगितले. स्मार्ट एलईडी टीव्ही घेण्यावर भर असून पूर्वी ऐंशी टक्के सिंगल डोअर फ्रिज घेणारांची संख्या होती. आता हेच प्रमाण डबल डोअर फ्रिज खरेदीमध्ये दिसून येते.

ज्वेलरीतकेवळ रविवार
ज्वेलरीखरेदीमध्ये रक्षाबंधन, गौरी गणपती नवरात्र अशा तिन्ही सणांत विशेष व्यवसाय झाला नाही. सोन्याचे भाव २५ हजारांवरून २७ हजार ५०० झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची सोने खरेदीत फारशी रुची दिसत नसल्याचे सोनपरी गोल्डचे श्रीकांत सराफ यांनी सांगितले.

विविध ऑफर्समुळे ग्राहक आकर्षित : काहीकंपन्यांनी मोठ्या खरेदीवर कॅमेरा, पॉवर बँक, कॅश कार्ड, मोबाइल आदी मोफत देण्याच्या ऑफर दिल्या आहेत. दहा, बारा, अठरा महिन्यांच्या परतफेडीच्या आणि शून्य टक्के व्याजावर वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केवळ पाचशे रुपये कागदोपत्री खर्च घेऊन वस्तूच्या मूळ किमतीइतके वित्तसाहाय्य केले जात आहे. काही दुकानांनी लकी ड्रॉद्वारे दुबई बँकॉकच्या सहलीची ऑफरही ग्राहकांसाठी ठेवली आहे.